गौरी मला तुझ्या सोबत एक फोटो हवा आहे – माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे

ब्राम्हणगावची गौरी पगारे झाली सारेगमप महाविजेती

एकदा गौरी एका विवाह सोहळ्याच्या ठिकाणी माझ्याकडे आली आणि म्हणाली, ‘ताई मला तुमच्या सोबत एक फोटो काढायचा आहे.’ मात्र आज तिच्या या प्रेरणादायी विजयाने मला तिच्यासोबत एक फोटो काढायचा आहे. इतकी गौरी कर्तुत्वाने आणि कलेने मोठी झाली आहे, अशी भावना मनात आल्याचे गौरोवोद्गार सौ.स्नेहलताताई कोल्हे यांनी व्यक्त केले.

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २६ : झी मराठी वाहिनीवर सारेगमप लिटिल चॅम्पस् चं नवीन पर्व सध्या सुरू आहे. या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच थाटामाटात पार पडला. या पर्वात गौरी पगारे सा रे ग म प लिटिल चॅम्पसची महाविजेती ठरली आहे, त्याबद्दल माजि आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी गौरीचे अभिनंदन केले आहे. हा विजय आपल्या कोपरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा असल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे.

सुरेश वाडकर, सलील कुलकर्णी, वैशाली माडे, आदर्श शिंदे, आनंद शिंदे या मान्यवरांच्या उपस्थितीत गौरीला सा रे ग म प ची महाविजेती म्हणून घोषित करण्यात आलं. गौरी अत्यंत खडतर परिस्थितीतून पुढे आली असून तिची आई अलका यांचा संघर्ष शब्दात मांडण्यापलिडकचा आहे. लहान वयातच गौरीने एक मोठी गायिका होण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते साकार झाले आहे.

आपल्या तालुक्यातील ब्राम्हणगावची असणारी गौरी ही आज महाराष्ट्राची लाडकी गायिका ठरली आहे. यातून ग्रामीण भागातून देखील कलाकार पुढे जाऊ शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण समोर ठेवले गेले आहे. कला ही अधिक बिकट संघर्षातून फुलते आणि बहरते. गाणे गावे असे आपल्या सर्वांना वाटते पण तितका मंजुळ कंठ मिळणे ही ईश्वरीय देणं असावी लागते.

गौरीच्या या आदर्शाने कोपरगावसह महाराष्ट्राची मान उंचावली गेली आहे. कलारत्नाची खान आपल्याकडे आहे, मात्र त्यांना वाव आणि साथ मिळणे गरजेचे आहे. गौरीला आणि तिच्या कुटुंबाला माझ्याकडुन नेहमी सहकार्य असेल. तिच्या कलेचा आणि गुणवत्तेचा सन्मान हा आपल्यासाठीही भुषनावह बाब आहे. गौरी ही आपल्या कोपरगावच्या कलासंस्कृतीचा अलौकिक अलंकार आहे, अशा भावना सर्वत्र झाल्या आहेत.

संजीवनी उद्योग समूह, बिपीनदादा कोल्हे, युवानेते विवेक कोल्हे यांनीही गौरीचे अभिनंदन केले आहे. सर्व स्तरातून गौरीवर अभिनंदन आणि कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे.