शेवगाव प्रतिनिधी, दि. १९ : शेअर मार्केटिंगच्या नावाखाली अधिक परतव्याचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयाला अनेकांना चूना लावण्याचे प्रकार या परिसराला आता नवे राहिले नाहीत. मात्र सिंदखेड राजा येथील एका बँकिंग संस्थेने शेवगाव येथे धूम धडाक्यात शाखा सुरु करून दर साल दर शेकडा १० ते १५ टक्के व्याज दराने ठेवी दाराकडून मोठ्या प्रमाणात ठेवी स्वीकारल्या आणि अचानक टाळे ठोकून सर्व जणांनी पोबारा केल्याचा प्रकार शेवगावी घडला आहे. काल रात्री उशिरा या संदर्भात काही ठेवीदारांनी एकत्र येऊन संस्थेच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध शेवगाव पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
या संदर्भात दामोधर भांडेकर वय ५० धंदा शेती रा मंगलनाथ कॉलनी माजलगाव यांनी येथील मातृतीर्थ शिंदखेड राजा अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष दीपक शिंदे बाबू सिंग चव्हाण, उपाध्यक्ष दिलीप गोपाळराव वाघमारे, सचिव मोहन रुस्तुम माघाडे यांचेसह संचालक गजानन उत्तम कुहिरे, राजू रंगनाथ मेहेत्रे, प्रकाश गोबरा राठोड, लक्ष्मणराव नानासाहेब भोसले, नीता मोहन माघाडे, सविता निलेश भोसले, निलेश रंगनाथ भुतेकर, उद्धव उत्तम गव्हाड सर्व राहणार सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा यांनी मिळवून मातृतीर्थ सिंदखेड राजा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी शेवगाव नावाची बँक सुरू करून त्याद्वारे लोकांना जास्त व्याज दर देण्याचे अपिष दाखवून विश्वास संपादन करून त्यांचे कडून पैसे स्वीकारून लोकांना त्यांनी गुंतवलेले मूळ पैसे व त्यावरील परतावा देखील परत न करता सदरील रक्कम स्वतःचे फायदे करता वापरून अपहार करून आर्थिक फसवणूक केली असल्याची कायदेशीर फिर्याद दिली आहे.
या फिर्यादिन म्हटले आहे की, शरद भांडेकर यांनी पत्नी संध्या भांडेकर यांचे नावे चार लाख रुपये, स्वतःचे नावे चार लाख तसेच मेहुणे सचिन वनकुंद्रे यांचे नावे तीन लाख रुपये असे पंधरा लाख रुपये देऊन एक वर्ष मुदतीच्या अकरा टक्के व्याजदराने दिनांक ७ डिसेंबर २३ ला गुंतवणूक म्हणून केली होती. त्यानंतर मार्च २०२४ ला माझे मित्र संजय घाडगे व रवि राठोड यांच्याकडून समजले की मातृतीर्थ सिंदखेड राजा अर्बन क्रेडिट कार्बन को-ऑप.सोसायटी शेवगाव ही बँक बंद झाली असून येथील संचालक मंडळ पसार झाले आहे.
त्यानंतर मी प्रत्यक्ष मातृतीर्थच्या शेवगाव येथील कार्यालयात गेलो असता ते बंद आढळून आले तेथे शेजारी विचारपूस केली असता समजले की, माझे सारखे इतर लोकांकडून देखील चेअरमन दीपक बाबूसिंग चव्हाण व त्याच्या साथीदार यांनी जास्त परताव्याचे आम्ही दाखवून विश्वास संपादित करत त्यांच्याकडून पैसे स्वीकारून कोणासही परतावा तसेच मूळ रक्कम देखील परत न करता बँक बंद करून फसवणूक करून निघून गेले आहेत.
या व्यतिरिक्त गणेश चंद्रकांत कुलकर्णी १५ हजार शामल महेश साडेगावकर दोन लाख अर्जुन दगडू कराळे तीन लाख राजेंद्र ज्ञानेश्वर कराळे दोन लाख, शिवाजी किसन कराळे दोन लाख, योगेश वसंतराव जाधव पाच लाख, सुरेश बप्पासाहेब लांडे तेरा लाख, प्रवीण सुरेश लांडे ११ लाख, कानिफनाथ लक्ष्मण घनवट सात लाख ४० हजार व ज्योती संभाजी वंजारी सात लाख रुपये अशी एकूण सदस्य ६७ लाख ४० हजार रुपयाची फसवणूक केल्याचे फिर्याद शुक्रवारी रात्री उशिरा दाखल करण्यात आली आहे.