शेवगाव प्रतिनिधी, दि.२९ : शेवगावातील गाडगे बाबा चौकात गावठी कट्टा व जिवंत काडतुसासह एका सराईत गुन्हेगारास शेवगाव पोलिसानी रंगे हात पकडून चतूर्भुज केले आहे. या संदर्भात जज्या उर्फ जहीर नवाब शेख राहणार नाईकवाडी मोहल्ला शेवगाव यास ताब्यात घेण्यात आले असून त्याच्याकडून एक गावठी कट्टा तसेच तीन जिवंत काडतुसे असलेले मॅक्झिन व दोन मोबाईल असा एकूण ४८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल शाम बाबासाहेब गुंजाळ यांचे फिर्यादीवरून आरोपी जहीर शेख याचे विरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३ /२५, ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गुरुवार दि. २८ चे रात्री साडेअकराचे सुमारास येथील शेवगाव-पाथर्डी रस्त्यावरील गाडगे बाबा चौकात एक युवक गावठी कट्टा विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती शेवगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिगंबर भदाणे यांना मिळाल्यानुसार त्यांनी लगेच घटनास्थळी सापळा लावून आरोपीला जागेवर सीताफिने मुद्देमालासह पकडले आहे.
शेवगाव पोलिसांनी केलेल्या या कारवाईबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे. मात्र, काही दिवसापूर्वी झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर शेवगाव शहर आजही भयाच्या छायेत असताना झालेली ही कारवाई हिमनगाचे टोक ठरू शकते. म्हणूनच पोलीस प्रशासनाने अधिक सतर्क होऊन या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात यावा अशी नागरिकांची मागणी आहे.
यावेळी पथक पंचासह खाजगी वाहनाने चौकात गेले. दरम्यान आरोपी चौकात येताना दिसताच त्यास ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने जहीर उर्फ जज्ज्या शेख नाव सांगितले. यावेळी त्यांची अंगझडती घेतली असता, कमरेला गावठी कट्टा व मॅक्झीन मध्ये तीन जिवंत काडतुसे आढळून आली.
जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला, अप्पर पोलिस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक भदाणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीरज बोकील, हे कॉ. सुधाकर दराडे, हे कॉ. शाम गुंजाळ, ज्ञानेश्वर सानप, कृष्णा मोरे यांचे पथकाने ही कारवाई फत्ते केली आहे.