पाण्याचा तमाशा कमी होता म्हणून आणला गौतमीचा तमाशा – जयेश बडवे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२९ : शहरात गुरुवार २८ डिसेंबर रोजी महात्मा गांधी प्रदर्शन हॉल साईबाबा तपोभूमी येथे गौतमी पाटीलचा नाच ठेवला गेल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सांस्कृतिक कार्यक्रम घेणे गैर नाही पण काळ, वेळ आणि ठिकाण याचे भान न ठेवता परवानगी देणे आणि स्वतः अशा कार्यक्रमात काळे कुटुंबाने उपस्थित असणे ही कोपरगाव तालुक्यासाठी शरमेची बाब आहे. शहराला पिण्याच्या पाण्यासाठी केलेला तमाशा कमी होता की काय? म्हणून आता गौतमी पाटीलचा तमाशा आणला गेला असल्याचे टीकास्त्र भाजपा शहर सरचिटणीस जयेश बडवे यांनी काळे यांच्यावर सोडले आहे.

ज्या सद्गुरू साईबाबांची पवित्र तपोभूमी ही धार्मिक आणि अध्यात्मिक प्रेरणेचे ठिकाण आहे. गुरुवार हा बाबांचा वार असतो अशा दिवशी मोठ्या प्रमाणात शहरवासिय नागरिक दर्शनासाठी साई कॉर्नर येथे तपोभूमी मंदिरात आले होते. मंदिरात भजन आणि शेजारी नर्तन सुरू होते हे दुःखद आहे. अशी संतप्त भावना शहराची झाली आहे. बाहेरून लोक आणून शहराची संस्कृती बिघडवणे हे शोभा देणारे कृत्य नाही. निर्ल्लजासारखे धार्मिक ठिकाणी असे प्रकार होणे ही शरमेची बाब आहे.

धार्मिक ठिकाणी हजारो भाविक साईबाबांचे दर्शन घेण्यासाठी येतात तिथे भजन सुरू असताना जवळच असा नाचगाण्याचा कार्यक्रम पोलिसांनी कसा घेऊ दिला? असे असेल तर चौका चौकात लोक असे कार्यक्रम घेऊन कायदा सुव्यवस्था खराब करतील आणि प्रत्येकाने कार्यक्रमस्थळी मागणी केल्यास पोलीस सुरक्षा देऊ शकतील का ? असाच प्रश्न या निमित्ताने उद्भवला आहे.

तालुक्यातील महत्वाचे कुटुंब असणाऱ्यांनी तिथे हजर राहून अशा कार्यक्रमाला प्रोत्साहन देऊन तरुणाईचा थिल्लरपणा घडवून येण्यासाठी बळ देणे हे खेदजनक आहे. कोपरगाव शहराला पिण्यासाठी स्वच्छ पाणी नाही. वारंवार पाणी प्रश्न मिटणार असे जनतेला भासवले जाते आहे. मात्र, प्रत्यक्षात आमदार साहेब म्हणतात की ४०% काम झाले आहे याचा अर्थ ५ वर्षात एवढेच काम मार्गी लावून पुढे अजून किती वर्ष आणि पिढ्या गेल्यावर शहराला पाणी मिळणार याचे उत्तर कोणीही देण्यासाठी तयार नाही.

शहर आज गढूळ आणि गाळ मिश्रित पाणी पिते आहे. याची नैतिक जबाबदारी घेतली जात नाही याउलट रोज शहराला पाजून गढूळ पाणी नाचवली गेली गौतमी अशी भावना घरा घरात आहे. चांगले काम करण्यासाठी अनेक माध्यम असतात मात्र, कधी दहीहंडीला नटी मंचावर नाचवली जाते तर आता कहर असा की खुद्द आमदारांच्याच ताब्यात असणाऱ्या महात्मा गांधी प्रदर्शन साईबाबा तपोभूमी या धार्मिक ठिकाणी गौतमी पाटील नाचवली गेली. त्याला हे अतिशय निंदनीय कृत्य आहे. अनेक विधायक उपक्रम घेऊन तरुणाईला दिशा देण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे असते मात्र, थिल्लर कार्यक्रमांना प्रोत्साहन देऊन वातावरण खराब करण्यात नेहमीच लोकप्रतिनिधी सहभागी असतात अशी टीका बडवे यांनी केली आहे.