विकासकामांचे बोर्ड फाडले आणि काळे – कोल्हे एकमेकांना नडले 

कोपरगावमध्येविकास छोटा आणि कार्यकर्त्यांचा राडा झाला मोठा  

 काळे कोल्हे यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या राड्याची चर्चा वाऱ्यासारखी जिल्हाभर पसरली. सर्वसामान्य नागरिकांनी माञ आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाले की, विकास कमी राडा जास्त आहे. अनेक समस्यांमध्ये अडकलेला तालुका पुन्हा वादात आडकु नये अशी आशा व्यक्त केली. 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : कोपरगावच्या उपनगरातील विकास कामाच्या श्रेयवादावरून व विकास कामाच्या फलकावरून वादविवाद करून तालुक्याच्या दोन नेत्यांच्या साक्षीने कार्यकर्त्यांची झाली झोंबाझोंबी, धक्का बुक्की, आणि पोलीसांचा सौम्य लाठीमाराने कोपरगावच्या नेत्यांनी  स्वातंञ्याच्या अमृतमहोत्सवाची सांगता केली. विकास छोटा राडा मोठा अशी अवस्था कोपरगावची झाली. एका बाजुला देश गुलामगिरीतुन मुक्त झाला. विकासाची शिखरे गाठत आहे. जगाच्या नकाशावर देश उंचावत असताना कोपरगाव शहरातील नागरिकांना दररोज पिण्याचे पाणी मिळत नाही. अजूनही आठ दिवसाआड पिण्याचे पाणी मिळते. 

स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी कोपरगावचे नागरीक व्याकुळ  झालेले असताना विकासाच्या नावाने गजर करणारे कोपरगावचे नेते व कार्यकर्ते देशाचा स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवाची सांगता चक्क विकास वादातून झाली. एका छोट्या विकास कामावरून मोठा राडा झाला. त्यात पोलीसांना सौम्य लाठीचार्ज करण्याची वेळ आली. तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून जनता ज्यांच्याकडे पहाते ते आमदार आशुतोष काळे व युवा नेते विवेक कोल्हे यांच्या साक्षीने हा राडा झाला हे विशेष आहे. 

 या घटनेची अधिक माहिती अशी की, कोपरगाव शहराच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या, काही उपनगरांसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडून  विकास कामांसाठी निधी मिळाला आहे. तो निधी माझ्या प्रयत्नातुन मिळाला असा दावा तालुक्याच्या दोन्ही नेत्यांनी केला. पालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांनी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधुन गवारे नगर, ओमनगर, शंकरनगर आदी उपनगराच्या रस्त्यासह विविध विकास कामाचा शुभारंभ करण्याचे ठरविले. १० कोटी रुपयेच्या विकास कामांचे भूमिपूजन आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आले. नियोजन कार्यक्रमाचे विविध ठिकाणी फ्लेक्स लावण्यात आले.

दरम्यान भाजपचे कार्यकर्ते यांनी संबंधित ठिकाणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रयत्नामुळे हा निधी मिळाल्याचे व उद्घाटनाचे फ्लेक्स लावून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. हि माहिती राष्ट्रवादी काॅंगेसच्या अर्थात काळेंच्या कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी ते फ्लेक्स उखडून टाकले. फ्लेक्स उखडून टाकल्याचे समजताच भाजपचे अर्थात कोल्हे यांचे कार्यकर्ते घटनास्थळी एकवटले. दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्याची माहिती आमदार आशुतोष काळे  व युवानेते विवेक कोल्हे यांना समजताच हे दोन्ही नेते घटनास्थळी पोहचले. दोन्ही नेते आमने सामने येताच कार्यकत्यांनी एकमेकांचा जयजयकार करीत त्यांना खांद्यावर घेवून जल्लोष करीत एकमेकांना आव्हान प्रति आव्हान देवू लागले.

आमदार काळे यांना कार्यकर्त्यांनी खांद्यावर उचलताच विरोधकांकडे पहात आमदार काळे यांनी दंड थोपटून काॅलर उडवली.  यावेळी विवेक कोल्हे यांनीही खांद्यावर उचलताच त्यांनीही दंड थोपटत प्रति आव्हान दिले. लागलीच कार्यकर्ते एकमेकामध्ये रेटारेटी सुरू केली. पोलीसांच्या साक्षीने धराधरी, झोंबाझोंबी सुरु झाली. अखेर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करुन परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यशस्वी झाले.

यावेळी झालेल्या घटनेबद्दल बोलताना आमदार आशुतोष काळे म्हणाले की, मी विनाकारण कोणाच्या वाटेला जात नाही, विकास कामात मी कधीच खोडा घालत नाही. परंतु मुद्दाम होवून जर कोणी आपल्या वाटेला आले तर त्याला सोडायचे नाही. विरोधकांना गेल्या ४० वर्षात विकास करता आला नाही. मी केवळ ४ वर्षात विकास कामे करून कोट्यवधी निधी आणण्यात यशस्वी झालो. दुसऱ्यांनी केलेल्या कामाचे उद्घाटन करुन श्रेय घेण्याचे विरोधकांना कायमची सवय पडली आहे, पण कोपरगावची जनता आता सुज्ञ झाली आहे. आगामी काळात पुन्हा मलाच आमदारकीची संधी देणार.

 अखेर पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे, राम खारतोडे, संभाजी शिंदे आदी पोलिसांनी आक्रमक कार्यकर्ते शांत करण्यात यशस्वी झाल्याने पुढील अनर्थ टळला.

भुमीपुजनावरून मला वाद करायचा नव्हता. मी एक लोकप्रतिनिधी म्हणून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांबरोबर त्या भुमीपुजनाच्या कार्यक्रमाला गेलो होतो. पण माझ्या कार्यकर्त्याबरोबर वाद घालत असल्याचे समजल्याने मी परत येथे आलो. पण तिथे माझ्या कार्यकर्त्यांचा जोश पहावून समोरचे पुरते गार पडले होते. कार्यकर्त्यांनी आपला हा जोश तसाच कायम ठेवावा. जनता आपल्याला पुन्हा संधी देणार असे म्हणत काळे यांनी विरोधकांचा समाचार घेत कार्यकर्त्यांना बळ दिले. 

 दरम्यान घटनेची माहीती मिळताच विवेक कोल्हे घटनास्थळी आले. तेव्हा त्यांचे कार्यकर्ते आक्रमक दिसत होते. समोरच मुख्याधिकारी शांताराम गोसावी दिसताच कोल्हे यांनी मुख्याधिकारी गोसावी यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करताना म्हणाले की, कोपरगाव शहराच्या हद्दवाढीचा प्रश्न माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सर्वप्रथम मांडून शेजारची उपनगरे हद्दीत समाविष्ट करुन घेतले आणि सत्ताधारी पक्षात विद्यमान आमदार नसतानाही या उपनगराच्या विकासासाठी १० कोटी निधी मी माझ्या प्रयत्नातुन आणला आहे. नगर येथे राञी दोन वाजे पर्यंत थांबुन पालकमंत्री व माजी आमदार कोल्हे यांचे पञ जोडून निधी मिळवला. त्यावेळी मुख्याधिकारी म्हणुन तुम्ही कोणाच्या पुञांची वकीली करत होते हे मला माहीत आहे.

दुसऱ्यांनी उद्घाटन केल्याने किंवा फ्लेक्स फाडल्याचे मला अजिबात दुःख होणार नाही. कारण ‘कर्तृत्व कधीच झाकता येत नाही’ बोर्ड फाडल्याने त्याचा आम्हाला काही फरक पडत नाही. पण मुख्याधिकारी साहेब तुम्ही शासकीय अधिकारी आहात की, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहात. नगरपालिका ही कोणाच्या मालकीची नाही. जर तुम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असाल तर खुलेआम पक्ष प्रवेश करा. त्याचा फ्लेक्स मी जाहीरपणे लावतो. शासकीय अधिकारी असुनही शासकीय कार्यक्रमाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या गाडीवरुन जाताय. मुख्याधिकारी साहेब मी तुम्हाला अनेकवेळा सांगितले की, तुम्ही भेदभाव करु नका. आता शेवटचं सांगतोय असे म्हणत विवेक कोल्हे यांनी मुख्याधिकारी गोसावी यांना चांगलेच धारेवर धरत आपला संताप व्यक्त केला.