अवैध किटकनाशकांचा ६.४८ लाखांचा साठा जप्त

शेवगाव प्रतिनिधी, दि.१६ : वडुले बु. येथील शिवारात बंदी असलेला अवैध कीटकनाशक औषधांचा तब्बल ६. ४८ लाख रु किंमतीचा साठा छापा टाकून जप्त करण्यात आला. सदरची कारवाई, जिल्हा कृषी अधीक्षकाच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्याच्या पथकाने केली असून संबंधित गोडाऊनला सील ठोकण्यात आले आहे. या कारवाईनंतर तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी पंचायत समितीचे कृषी अधिकारी राहुल कदम यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून प्रशांत उर्फ बंटी दिलीप म्हस्के, (रा. मिरीरोड, शेवगाव) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दाखल फिर्यादी मध्ये म्हटले आहे, दि. १४ रोजी दुपारी मिळालेल्या गुप्त बातमी नुसार शेवगाव मधील मिरी रोड नाजिक वडुले येथे एका शेतात बंद असलेले गोडाऊनमध्ये कीटकनाशकचा मोठा साठा असल्याचे कळले.

त्यानुसार त्याची तपासणी करणेसाठी पुणे येथील मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी प्रवीण देशमुख व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांचे मार्गदर्शनाखाली तालुका कृषि अधिकारी अंकुश टकले, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी आर. बी. ढगे, पंचायत समिती कृषी अधिकारी राहूल कदम, कृषी विस्तार अधिकारी एस. जी. फाजगे यांचे पथकाने छापा टाकला असता, सदरील जागेवर कीटकनाशके कायदे अन्वये बंदी घातली असलेल्या नूवान व फोरेट या औषधांचा मोठा साठा आढळून आला.

सदरील जागेचा किटकनाशक विक्री परवाना तसेच कोणतेही शासन परवानगीचे कागदपत्र नसतानाही संबंधित जागेवर कीटकनाशके साठा केलेला आढळून आला. तेथे सापडलेल्या सर्व औषधाचा पंचनामा करून सुमारे ६. ४८ लाख किंमतीचा सर्व साठा जप्त करून ते गोडाऊन सील करण्यात आले असून कृ. अ. कदम यांचे तक्रारीवरून शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृषि विभागाच्या करवाईमुळे बोगसगिरीला आळा बसून अशा कीटकनाशक विक्री करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. तसेच शेतकऱ्यांना उत्तम दर्जाचे बियाणे, खते, कीटकनाशके उपलब्ध होतील यासाठी कृषी विभागाच्या वतीने दक्षता घेत आहोत. असे प्रकार कोणास दिसून आल्यास तत्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.