काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाच्यावतीने पञकार सन्मान सोहळा संपन्न
कोपरगाव प्रतिनिधी दि.९ : अतिशय कमी वयात आमदार आशुतोष काळे यांनी अनेक जबाबदाऱ्या पार पाडीत आमदार म्हणुन उत्तम कार्य करीत आहेत. त्यांचा स्वभाव अतिशय गोड आहे राहत्याचे पेरू आणि कोपरगावचे आमदार आशुतोष काळे खुपच गोड आहेत. त्यांची कार्यशैली व मनमिळावुपणा मनाला भावणारा आहे. अशी भावना जेष्ठ पञकार संपादक संजय आवटे यांनी व्यक्त केले.
रविवारी दुपारी कोळपेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाच्या वतीने पञकारांचा सन्मान सोहळा संपन्न झाला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ पञकार संजय आवटे होते तर कार्यक्रमाला आमदार आशुतोष काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शेकडो पञकार बांधवांचा सन्मान करण्यात आला.
संजय आवटे पुढे म्हणाले की, अहमदनगर जिल्ह्यातील पञकार व हा जिल्हा म्हणजे वेगळं रसायन आहे. माध्यमं कितीही बदलले तरी जनमत हे आशयात आहे. सर्व सामान्यांना केंद्रबिंदू ठेवून पञकारांच्या लिखानाचा आशय हवा. सध्या काही माध्यमं ही सहमती करण्याचे कारखाने झाले आहेत. नेते जे बोलतील, नेत्यांना जे हवं तेच प्रसिद्ध करतात. यामुळे वेगळा आवाज दाबुन टाकला जातोय. माञ ग्रामीण भागातील पञकार पञकारीतेचा वारसा जीवंत ठेवतात. पञकारीतेच्या पुरस्कारामध्ये ९० टक्के पुरस्कार हे ग्रामीण भागातील पञकारीतेलाच मिळतात माञ ते पुरस्कार शहरी भागातील पञकार घेवून जातात.
सोशल मिडीयावर अथवा चॅनलवर कितीही दिवसभर दाखले किंवा प्रसिद्ध केले तरी वर्तमानपत्रात छापून आल्याशिवाय खाञी पटत नाही म्हणूनच वर्तमानपञांची विश्वासाहर्ता आजही कायम आहे. ज्याला कोणी नाही त्याचा आवाज म्हणजे पञकार आहे. माञ पञकारांच्या बातमीचा केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस असला पाहिजे. हा देश कोण्या एका मोदीचा, गांधीचा, किंवा पवार, ठाकरेचा नाही तर सर्वसामान्यांचा देश आहे. लोकशाहीतील इतर खांब कमकुवत झाले असले तरी पञकारीतेमुळे लोकशाहीचा चौथा खांब खंबीर आहे असेही ते म्हणाले.
यावेळी आमदार आशुतोष काळे म्हणाले की, माझ्या विकास कामांना गती देण्याचे काम पञकारांनी केले. माझी जशी चांगली बाजु मांडली तशीच चुकीचे असेल तेही मांडले तरी मी कधीच नाराज होत नाही उलट मला त्यातुन शिकायला मिळते. माझ्या विरोधात लिहीले म्हणून मी पञकांवर कधीच नाराज नसतो. गेल्या तीन वर्षात मतदार संघात कोट्यावधीचे अनेक विकास कामे मार्गी लावले. करोनाच्या महासंकटातही विकास कामाची गती सुरु होती. पञकारांमुळे मला काम करण्याची उर्जा मिळाली असे म्हणत काळे यांनी पञकारांप्रति ऋण व्यक्त केले.
या कार्यक्रमाला पञकार विकास अंञे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन दिलीपराव बोरणारे, माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे, संचालक प्रविण शिंदे, सुभाष आभाळे, अशोकराव मवाळ, शिवाजी घुले, राहुल रोहमारे यांच्यासह अनेक संचालक, पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरुण चंद्रे यांनी केले तर सुधार रोहम यांनी आभार मानले.