शेवगाव प्रतिनिधी, दि. १४ : शेवगाव शहरातील दंगलीशी प्रत्यक्ष संबंध नसताना ज्यांची नावे आरोपीच्या यादीत समावेश करण्यात आली आहेत ती नावे वगळण्यात यावीत. या घटनेला दोन महिने होऊन गेले असून आता कुठे गाव पूर्व पदावर येत असताना पोलिस प्रशासन आजही आरोपीच्या यादीत नवीन व्यक्तीची नावे वाढवत आहेत. हा प्रकार आता थांबवावा, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शिष्टमंडळाने पोलिस उपअधीक्षक सुनील पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
येथे दोन महिन्या पूर्वी घडलेल्या दंगल सदृश घटनेमुळे पोलिस प्रशासनाने केलेल्या कारवाईत व दाखल केलेल्या गुन्ह्यात ज्यांचा या दंगल घडवण्यात कोणताही सहभाग नव्हता अशा अनेक नागरिकांच्या नावांचा आरोपीच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये काही सामाजिक, राजकीय कार्यकर्त्यांची नावे एफआयआरमध्ये व नंतर रिमांड रिपोर्ट मधे घेतली आहेत. त्यामधे विविध संस्थामध्ये निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींचाही समावेश आहे.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कौन्सिल सदस्य कॉ. संजय नांगरे हे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी सातत्यानं विविध आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रयत्न करतात, दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाली त्यावेळी त्यांना मध्यस्थी करण्यासाठी बोलावून घेण्यात आले. आपल्या गावात असा प्रकार होऊ नये म्हणून दंगल होउ नये म्हणुन सोडविण्यासाठी ते गेले होते. तसेच स्थानिक पोलीस प्रशासन आकसाने पक्षपाती भूमिका घेतात म्हणून शेवगावचे पोलीस निरीक्षक यांचे विरूद्ध झालेल्या आंदोलनात सहभाग घेतला होता म्हणून त्यांचे आकसाने या गुन्ह्यात नाव गोवण्यात आले आहे.
तसेच दंगल सदृश परिस्थिती निर्माण झाल्यानंतर काही लोक काय प्रकार आहे, हे बघण्यासाठी व काही सामाजिक, राजकीय कार्यकर्ते दंगल शांत करण्यासाठी आलेले होते. शिवाय सीसीटीव्ही कॅमेरात दिसणार्यां सर्वांचाच दंगलीत सहभाग होता असे म्हणता येणार नाही. दंगल आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या ना जर आरोपी करण्यात आले तर भविष्यात येथून पुढे शहरात असा प्रकार घडत असेल तर कुणी ही सोडवायला येणार नाही.
या सर्व परिस्थितीचा विचार करून या प्रकरणी प्रत्यक्ष दंगलीशी ज्यांचा काहीही संबंध नाही अशांची नावे सखोल चौकशी करून या गुन्ह्यातून वगळण्यात यावीत. दंगल होऊन दोन महिने झाली आहेत. शेवगाव शहरातील वातावरणांत संशयास्पद व पोलीस कारवाईच्या भीतीने ग्रस्त बनले आहे. त्याचा परिणाम येथील सामाजिक सलोख्यावर होऊ शकतो. शेवगाव हे सामाजिक सलोखा पाळणारे शांत सहिष्णू परंपरा असलेले शहर असून आजपर्यंत शेवगावला दंगलीचा इतिहास नाही परंतु या प्रकारामुळे समाजात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आता पर्यंत अनेक जणांचे आरोपीच्या यादीत नाव आलेले असतानाही रोज नवीन नावांचा समावेश पोलिस आरोपीच्या यादीत करत असल्याने जनता भयग्रस्त झाली आहे. दंगल घडून गेल्यानंतर कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नसताना रोज आणखी नांव आरोपीच्या यादीत समावेश करण्याचा प्रकार बंद करून नागरिकांना शांततामय जीवन जगण्यासाठी पोलिसांनी सहकार्य करावे. असे निवेदन या शिष्टमंडळाने शेवगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील यांना दिले आहे. शिष्टमंडळात भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. ॲड. सुभाष लांडे, शेवगाव वकील संघाचे माजी अध्यक्ष जेष्ठ विधीज्ञ ॲड. लक्ष्मीकांत वेलदे, कम्युनिस्ट पक्षाचे तालुका सेक्रेटरी कॉ. संदिप इथापे, कॉ. दत्तात्रय आरे, कॉ. गोरक्ष काकडे, बबनराव लबडे उपस्थित होते.