कायदा पायदळी तुडवू नका, आम्ही शांत आहोत शांतच राहू द्या – मनोज जरांगे

शेवगाव प्रतिनिधी, दि. २४ : मराठा आरक्षण आता टप्प्यात येऊन पोहोचले आहे. त्यामुळे सकल मराठा बांधवांनी कुठेही जातीय तणाव निर्माण होणार नाही यासाठी दक्ष असावे असे सांगून येवल्यात आपले बोर्ड फाडल्याचे माध्यमातून कळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच अजित पवारांनी त्यांना समज द्यावी. ते संविधानिक पदावर बसले आहेत. त्यांनी कायदा पायदळी तुडवू नये. आम्ही शांत आहोत, शांतच राहू द्या. आम्हाला डीवचू नका. ते जर शांत बसले नाहीत, तर मी पण शांत बसणार नाही. मंत्री छगन भुजबळ यांचे नाव न घेता, मनोज जरांगे यांनी इशारा दिला.

संकल मराठा समाजाच्यावतीने साई लॉन्सवर जरांगे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जरांगे म्हणाले, सत्तर वर्षापूर्वी मराठा समाजाला आरक्षण दिले असते, तर आज मराठा समाज प्रगत झालेला असता. मात्र, जाणूनबुजून आरक्षण दिले गेले नाही. सत्तर वर्षे षडयंत्र रचले गेले, पुरावे दाबले गेले. आता ३२ लाख पुरावे सापडले आहेत. दीड-दोन कोटी मराठा समाज त्याचा लाभ घेऊ शकतो. तर नगर जिल्ह्यात सव्वातीन लाख नोंदी सापडल्या आहेत. सुमारे १५ लाख मराठ्यांना त्याचा फायदा होणार आहे.

मराठ्यांनी ओबीसींना आरक्षण देताना विरोध केला नाही.  मराठा समाज सर्वांसाठी उभा राहिला, सत्तर वर्षांत अनेक पक्ष मोठे केले. आपले मानून नेते मोठे केले, गरज पडेल तेव्हा मदत करतील वाटत होते. मात्र, ओबीसींसह मराठा नेतेही पाठीमागे उभे नाहीत. तब्बल सव्वापाच तास उशिराने सभा सुरु होऊन देखील सभेला हजारोंच्या संख्येने गर्दी उपस्थिती होती.

यावेळी विविध राजकीय पक्षांचे, संघटनेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते. जरांगे यांचा शेवगाव तालुक्यात प्रवेश झाला तेथे भयगाव व भातकुडगाव फाट्यावर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. तेथून दोनशे स्वयंसेवकानी शंभर मोटर सायकलची रॅली काढून त्यांचे शेवगाव पर्यंत सारथ्य केले. जरांगे यांच्या सभेपूर्वी राज्य समन्वयक प्रकाश सोळंकी यांचेही भाषण झाले.

तीस जेसीबी मधून पुष्पवृष्टी – जरांगे पाटील यांचा ताफा शहरात दाखल होताच संत गाडगे बाबा चौकात रस्त्याच्या बाजूला उभा असलेल्या तीस जेसीबी मधून युवकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली. सभास्थळी दाखल झाल्यावर शाळकरी मुलीकडून त्यांचे औक्षण करण्यात आले. त्यानंतर सभेला सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या प्रवेश द्वारा जवळ वैद्यकीय मदत कक्ष उभारण्यात आले होते. तसेच, ठिकठिकाणी रुग्णवाहिका उभ्या होत्या, तेथे डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी होते. सकल मराठा समाजाचे स्वयंसेवक, पोलिस, गृहरक्षकदलाने पार्किंगचे व वाहतुकीचे योग्य नियोजन केले.