शेवगाव प्रतिनिधी, दि. २४ : शेवगाव शहरात प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेद्वारे बारा तेरा दिवसातून नळाला थोडा वेळ पाणी सोडण्यात येत असल्याने आ. मोनिका राजळे यांच्या विशेष प्रयत्नातून ७८ कोटी रुपये खर्चाची स्वतंत्र पाणी पुरवठा योजना मंजूर झाली. दरम्यान नगरपरिषदेवर प्रशासक राज सुरु झाले. त्यांनी या योजनेच्या निविदा काढून संभाजीनगर येथील इंद्रायनी कन्स्ट्रक्शनला गेल्या जून महिन्यात आदेशही दिला. मात्र, पाच महिने होऊनही संबंधित ठेकेदाराने अद्याप देखील काम सुरु केलेले नाही.
ठेकेदार काम करण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे येथील नगरपरिषदेने योजनेचे हे काम अन्य ठेकेदारास सोपवून शेवगावकराची कित्येक दिवसापासून सुरु असलेली पिण्याच्या पाण्याची परवड थांबवून दिलासा देण्याच्या मागणीच्या पाठपुराव्यासाठी तसेच ही महत्वाकांक्षी योजना विनाकारण ताटकळत ठेवण्यास जबाबदार असलेल्या येथील नगरपरिषदेचे मुख्याधिकारी व अन्य संबंधितावर प्रसंगी कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मुख्यमत्री शिंदे गटाच्या शिवसेनेचे युवक आघाडीचे जिल्हाध्यक्ष साईनाथ आधाट व तालुकाध्यक्ष आशुतोष डहाळे यांनी येथील तहसील कार्यालया समोर गुरुवार पासून बेमुदत उपोषण आंदोलन सुरु केले आहे.
या आंदोलनाचा दुसरा दिवस असून वंचित बहुजन आघाडी, स्वाभिमानी शेतकरी संघटना अशा तर राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनानी या आंदोलनास जाहीर पाठिबा दिला आहे. शेवगाव शहराचा वाढता विस्तार व लोकसंख्या लक्षात घेता. येथे किमान दिवसाआड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होणे गरजेचे असताना १२ /१३ दिवसातून एकदा व तो ही अल्पवेळ पाणी पुरवठा होत असल्याने लोकप्रतिनिधीसह नगरपरिषद प्रशासन व अन्य संबंधिताना वेळोवेळी जनतेच्या असंतोषाला सामोरे जावे लागत आहे.
जनतेच्या सततच्या मागणीची दखल घेऊन आ. राजळे यांच्या पाठपुराव्यातून शेवगाव शहरासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा अभियानान्तर्गत स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असून शेवगाव नगरपरिषदे कडून या योजनेचे काम देण्यात आले असून पाणी पुरवठा योजनेला कार्यारंभ आदेश जून मध्ये देण्यात आलेला नसतांना पाच महिने होऊनही प्रत्यक्ष काम सुरु झाले नाही.
या संदर्भात उपोषणकर्त्यांनी दिलेल्या निवेदनात संबधित ठेकेदारावर यवतमाळ जिल्हयातील नगरपरिषदेच्या कामात अशाच प्रकारची दिरंगाई केल्याचा व फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. असे असतांना या ठेकेदारास काम देण्याचा घाट येथील स्थानिक हस्तका मार्फत घातला गेला आहे. त्यामुळे सदर काम अन्य ठेकेदारास देऊन शेवगावकराची पिण्याच्या पाण्याची परवड थाबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.