राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत नांदेडच्या महात्मा फुले माध्यमिक विद्यालयाची बाजी

शेवगाव प्रतिनिधी, दि. २४ : ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत पद्मभूषण कै. बाळासाहेब भारदे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त शेवगाव येथील भारदे साक्षरता प्रसारक मंडळ आयोजित बुधवारी (दि.२२) भारदे विद्यालयाच्या प्रांगणात पार पडलेल्या राज्य स्तरीय वक्तृत्व स्पर्धेत या वर्षाचा फिरता करंडक  नांदेडच्या महात्मा फुले माध्यमिक शाळेने पटकावला. 

कै. भारदे वक्तृत्त्व स्पर्धेचे हे सातवे वर्ष असून यावेळी बीड, संभाजीनगर, रायगड, नांदेड, सातारा, दौंड, राहुरी, श्रीगोंदा, पाथर्डी, शेवगाव आदि ठिकाणच्या सात जिल्ह्यातील ३० विद्यालयातील ७० स्पर्धक सहभागी झाले होते. लहान व मोठ्या गटात सांघिक गुणांकन प्राप्त विद्यालयाला स्पर्धेचा मानांक दिला जाणारा ‘कै. बाळासाहेब भारदे स्मृती फिरता करंडक’ यावर्षी नांदेड येथील महात्मा फुले माध्यमिक शाळेने मिळवला आहे.

यावेळी दोन्ही गटातील पुढील विजयी स्पर्धकांना वैयक्तीक पारितोषिके देण्यात आली. इयत्ता चौथी ते सहावी या लहान गटात राजेश्वरी जाधव (सावित्रीबाई फुले विद्यालय राहुरी), आराध्या भगत (डेव्हिड स्कूल, अलिबाग), आर्या खराडे (सावित्रीबाई फुले विद्यालय राहुरी),यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त केला. तेजस्वी वरुळकर (इन्फिनिटी स्कूल सिल्लोड), सिद्धांत टोंगळे (महात्मा फुले विद्यालय, नांदेड), शुभ्रा म्हस्के (जि प प्रा शाळा भापकर वस्ती, सालवडगाव), ऋग्वेद बोडखे (नानासाहेब भारदे इंग्लिश मीडियम स्कूल शेवगाव) यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली.  

तर इयत्ता सातवी ते नववी या मोठ्या गटात वेदांत टोंगळे (महात्मा फुले विद्यालय नांदेड), ज्ञानेश्वरी झिरपे (आबासाहेब काकडे विद्यालय शेवगाव), आराधना देशमुख (शारदा मंदिर प्रशाला संभाजीनगर) यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक प्राप्त केले. तर यशराज हेगडे (धर्मवीर संभाजी विद्यालय, सातारा), ज्ञानेश्वरी जाधव (सावित्रीबाई फुले विद्यालय राहुरी), ज्ञानेश्वरी आंधळे (कानिफनाथ विद्यालय जवखेडे पाथर्डी), सानवी देशपांडे (शारदा मंदिर प्रशाला संभाजीनगर) यांना उत्तेजनार्थ पारितोषिके मिळाली आहेत.

सर्व बक्षीस पात्र स्पर्धकांना संस्थेचे अध्यक्ष माजी प्राचार्य रमेश भारदे, सचिव शामसुंदर भारदे, शाळा समिती अध्यक्ष हरीश भारदे, रागिनी भारदे, प्राचार्य शिवदास सरोदे यांचे हस्ते रोख रक्कम, सन्मान चिन्ह प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले. उपप्राचार्य संजय कुलकर्णी, उमेश घेवरीकर, गोकुळ घनवट, सदाशिव काटेकर आदिनी स्पर्धेच्या यशास्वीतेसाठी परिश्रम घेतले.

स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. गोकुळ क्षीररसागर, प्राचार्य डॉ. ओंकार रसाळ, राम झिंजुर्डे, हरिभाऊ नजन, मीनाक्षी कदम, प्रदीप बोरुडे यांनी केले. अमृत गोरे यांनी प्रास्ताविक तर निलेश मोरे यांनी सूत्रसंचालन केले.