कोपरगाव प्रतिनिधी, दि.१० : शहरातील कापडबाजार भागात एका बेवारस गोमातेची प्रचंड वेदनेच्या कळा सोसून झाली खरी मात्र, तिची गर्भपिशवी बाहेर आली, तालुका लघु चिकित्सालयाचे पशुधन विकास अधिकारी दिलीप दहे हे अगदी वेळेवर देवदूतासारखे धावून आले, त्यांनी त्यांचे कौशल्य पणाला लावून, न्यू यंग स्टार क्लबचे कार्यकर्ते, कापड बाजारातील तरुण मंडळ, व पशु मित्रांच्या मदतीने तातडीने निर्णय घेत शस्त्रक्रिया करून दोन ते अडीच तासाच्या अथक परिश्रमानंतर यशस्वीरित्या गावरान गाईचे व जन्मलेल्या गोऱ्ह्याचे प्राण वाचवले.
या निमित्ताने देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय येत पशुवैद्यकीय अधिकारी गाईसाठी देवासारखे धावून आले याचा प्रत्यक्ष अनुभव उपस्थितांनी याची देही याची डोळा अनुभवला. शुक्रवारी संध्याकाळची साडेआठची वेळ गावात भटकंती करणारी बेवारस गोमाता तिचे दिवस भरल्याने प्रचंड वेदना होतात. तिची तगमग सुरू होते. तेवढ्यात ती कोसळतेही. त्यातून ती गोमाता सावरून उठते. व पाचच मिनिटात सुंदरशा गोऱ्ह्याला जन्म देते.हे सर्व पाहत असताना तरुणांची धावपळ होते.
कुणी पशुधन प्रेमींना बोलवते तर कुणी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना दुरध्वनी करतात. तालुका लघु चिकित्सालयाचे पशुधन विकास अधिकारी दिलीप दहे तातडीने दाखल होतात. उपचार सुरू करतात. सुमारे दोन ते अडीच तासाच्या अथक प्रयत्नानंतर गोमातेला विविध औषधे इंजेक्शन, सलाईन दिले जाते. त्यानंतर गोमातेची बाहेर आलेली गर्भपिशवी पुन्हा आत मध्ये लोटून यशस्वी शस्त्रक्रिया व टाके टाकण्यात येतात. काही तासानंतर गाईला शुद्ध येते. ती आपल्या जन्मलेल्या वासराकडे धाव घेते.
अशा रीतीने पशुधन विकास अधिकारी दिलीप दहे यांनी घेतलेल्या काळजीपूर्वक उपचार पद्धतीमुळे माय माऊली सुरक्षित आहेत. शहरात फिरणाऱ्या मोकाट जनावरांच्या बाबत अनेकदा उपचार करण्यासाठी सहसा कुणी पुढे येत नाही. मात्र, उपस्थित सर्व तरुण मंडळ व सहकारी आदींनी गोमातेचे प्राण वाचवले.