ऊस तोडणी मजुरांच्या टंचाईमुळे यांत्रिकीकरणाकडे वळावे लागणार – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : यावर्षी पावसाळ्यात साडे तीन महिने अपेक्षित पाऊस पडला नसल्यामुळे ऊस लागवडी होवू शकल्या नाही व शेतात उभ्या असलेल्या ऊस पिकाचे देखील टनेज घटणार आहे. त्यामुळे गाळप हंगामाचे ठेवलेले उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी कार्यक्षेत्राबाहेर दूरवरून ऊस वाहतूक करावी लागणार आहे. त्यासाठी दूरवरून ऊस वाहतूक करण्यासाठी वाहन धारकांनी सज्ज राहावे असे आवाहन गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.    

गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लि; गौतमनगरची ५२ वी व गौतम केन ट्रान्सपोर्ट कंपनी प्रा. लिमिटेडची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच कंपनीचे मार्गदर्शक संस्थेचे चेअरमन आ. आशुतोष काळे यांच्या अध्यक्षतेखाली खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. याप्रसंगी ते बोलत होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, कर्मवीर शंकररावजी काळे व सौ. सुशीलामाई काळे यांच्या प्रतिमेचे पूजन करून सभेस प्रारंभ झाला. अध्यक्ष पदाची सूचना पवन गोरे  यांनी मांडली. सदर सूचनेस रविंद्र आहेर यांनी अनुमोदन दिले. संचालक आप्पासाहेब निकम  यांनी २०२२-२३ या आर्थिक वर्षात निधन झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली.

आमदार काळे पुढे म्हणाले की, मागील वर्षी कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याच्या पहिल्या टप्यातील नूतनीकरणाचे काम पूर्ण होवून दुसऱ्या टप्यातील काम देखील अंतिम टप्प्यात असून गळीत हंगामाची पूर्व तयारी सुरु आहे. यावर्षी जवळपास दीड महिना पावसाचा खंड  पडल्यामुळे त्याचा परिणाम यावर्षी व पुढील वर्षी जाणवणार आहे. चालू वर्षापासून कारखान्याची गाळप क्षमता वाढणार असल्यामुळे गाळपाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी कार्यक्षेत्राबाहेरून ऊस आणावा लागणार आहे. त्यासाठी सभासद ट्रक्स धारकांनी आपली वाहने सज्ज ठेवावी.

ऊस तोडणी व्यवसाय ठेकेदाराच्या हातात गेल्यामुळे मागील काही वर्षापासून जाणवत असलेली ऊस तोडणी मजुरांची अडचण यावर्षी व भविष्यात देखील जाणवणार आहे. त्यामुळे प्रत्येक ऊस वाहतूक वाहनधारकाने ऊस तोडणी मजुरांची स्वतंत्र टोळी तयार करावी. ऊस तोडणी मजुरांची जाणवत असलेल्या टंचाईमुळे यांत्रिकीकरणाकडे वळावे लागणार आहे. त्यामुळे सभासद ट्रक्स धारकांनी एकत्रितपणे केन हार्वेस्टर खरेदी करावे असे आवाहन केले. यावेळी ट्रक्स धारकांनी मांडलेल्या सर्व अडचणी  सोडविण्याच्या सूचना आ. आशुतोष काळे यांनी कारखाना व सबंधित प्रशासनाला दिल्या.

सभेचे प्रास्तविक गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व अहवाल वाचन जनरल मॅनेजर संतोष पवार यांनी केले तर आभार संचालक विजयराव जाधव यांनी मानले.यावेळी सर्व विषय टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आले.

 यावेळी ज्येष्ठ नेते छबुराव आव्हाड, गौतम बँकेचे चेअरमन सुधाकर दंडवते, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. मच्छिन्द्र बर्डे, संचालक दिलीपराव बोरनारे, सुधाकर रोहोम, सचिन चांदगुडे, वसंतराव आभाळे, शंकरराव चव्हाण, राहुल रोहमारे, शिवाजीराव घुले, सुनील मांजरे, श्रीराम राजेभोसले, मनोज जगझाप, अशोक मवाळ, श्रावण आसने, गंगाधर औताडे, अॅड. डी. जी. देवकर, गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्टचे कार्यकारी संचालक दौलतराव मोरे, गौतम केन ट्रान्सपोर्टचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर सुभाष गवळी, 

गोदावरी खोरे संचालक दिलीपराव शिंदे, विजयराव जाधव, विक्रम मांढरे, प्रदीप कुऱ्हाडे, कैलास आहेर, अशोक निळकंठ, रमेश कोळपे, विजय थोरात, विक्रम सिनगर, गौतम केनचे संचालक भिकाजी सोनवणे, अरुण घुमरे, बबनराव भारसाकळ, रामदास कोळपे, भाऊसाहेब जोरे, माणिकराव चंद्रे, गणेश आहेर,आप्पासाहेब निकम कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक सुनील कोल्हे, सेक्रेटरी बी.बी. सय्यद, असि. सेक्रेटरी संदीप शिरसाठ, फायनान्स मॅनेजर सोमनाथ बोरनारे, शेतकी अधिकारी कैलास कापसे, आदींसह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.