कोपरगाव प्रतिनिधी, दि. २८ : जगात अतिशय सुरक्षित समजल्या जाणाऱ्या सोने तारण व्यवसायात समता नागरी सहकारी पतसंस्था २ वर्षात ३०० कोटी रुपयांचा टप्पा पार करणारी महाराष्ट्रातील अव्वल पतसंस्था ठरली आहे. सभासदांचा संस्थेवरील विश्वास व संस्थेतील अत्याधुनिक तंत्रज्ञान युक्त प्रणाली यामुळे अधिक वेगाने हा टप्पा पार करण्यात आला आहे.
समताच्या एकूण कर्ज वाटपापैकी ५० टक्के कर्ज वाटप हे सोनेतारणाचे आहे. तसेच समता पतसंस्थेतील ठेवीदारांच्या ठेवींना देखील सोने तारण व्यवसायामुळे अधिक सुरक्षितता प्राप्त झाली असून समताने कमी कालावधीत वेगाने आर्थिक प्रगती करण्याचा विक्रम केला असल्याचे समता नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक संदीप कोयटे यांनी सांगितले.
समता नागरी सहकारी पतसंस्थेने १३ शाखांच्या माध्यमातून सोनेतारण व्यवसायात केलेल्या आर्थिक प्रगतीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी संस्थेने ३०० कोटी रुपयांचा सोनेतारणाचा व्यवसाय कमी कालावधीत पूर्ण केल्याबद्दल संस्थेचे जनरल मॅनेजर सचिन भट्टड व कोपरगाव शाखेचे शाखाधिकारी योगेश मोरे यांच्या हस्ते केक कापण्यात आला.
तसेच संस्थेचे जनरल मॅनेजर सचिन भट्टड म्हणाले की, समता आर्थिक क्षेत्रात वेगाने प्रगती करत असून ठेवी ही मोठया प्रमाणात वाढत आहे. हा यशस्वी टप्पा पूर्ण करण्यासाठी सोनेतारण व्यवसायाला सुरक्षितता देणारी अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त सुधन गोल्ड लोन या कंपनीचा सिंहाचा वाटा आहे. या कंपनीचे मार्गदर्शन व संस्थेचे चेअरमन काका कोयटे, संचालक मंडळ यांच्या सहकार्याने समता पतसंस्था कमी कालावधीत सोनेतारण व्यवसायात ५०० कोटी रुपयांचा टप्पा पार करणार आहे.
बैठकीला सुधन गोल्ड लोन च्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वाती कोयटे, संस्थेचे अंतर्गत ऑडिटर स्वप्निल घन यांनी उपस्थित राहून समता पतसंस्थेचा सोनेतारण विभाग, मुख्य कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उपस्थितांचे आभार मुख्य कार्यालयाच्या एच. आर. उज्वला बोरावके यांनी मानले.