सहकारात परिवर्तनाची ताकद, सहकारी संस्थांनी गावाच्या विकासात योगदान द्यावे – विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : सहकार चळवळ म्हणजे तीनचाकी गाडी आहे. एक चाक म्हणजे व्यवस्थापन व कर्मचारी, दुसरे चाक म्हणजे सभासद व तिसरे चाक म्हणजे शासन किंवा शासकीय धोरणे. ही तिन्ही चाके व्यवस्थित चालली तरच सहकाराची गाडी सुरळीत पुढे जाऊ शकते. परिवर्तन घडविण्याची ताकद सहकारात आहे. ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा असणाऱ्या विविध कार्यकारी सहकारी संस्थांनी केवळ व्याजावर अवलंबून न राहता अतिरिक्त उत्पन्नाचे मार्ग शोधले पाहिजेत. शेतकरी सभासदांसह गावच्या विकासाला हातभार लावला पाहिजे, असे आवाहन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले.

कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील भोजडे नंबर २ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. च्या वतीने कै. सीताराम व्यंकटराव सिनगर यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारा सन २०२३ चा आदर्श सभासद पुरस्कार अशोकराव रामजी मंचरे यांना सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रम डवाळा (ता. वैजापूर) येथील ह. भ. प. भरत महाराज व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन विवेक कोल्हे यांच्या हस्ते गुरुवारी (२८ सप्टेंबर) प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे होते.

यावेळी ह. भ. प. भालचंद्र महाराज, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तालुका विकास अधिकारी अविनाश काटे, शिवसेना तालुकाप्रमुख शिवाजीराव ठाकरे, शहाराम सिनगर, नानासाहेब सिनगर, संभाजीराव सिनगर, दिलीपराव सिनगर, रंगनाथ सिनगर, देवराम मंचरे, संजय सिनगर, अनंतराव सिनगर, बाळासाहेब सिनगर, व्यंकटराव घट, प्रमोद सिनगर, दत्तोपंत सिनगर, अशोकराव सिनगर, भोजडे नं.२ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष मुकुंदराव सिनगर, उपाध्यक्ष दिनकर सिनगर, संचालक ज्ञानेश्वर सिनगर, रामनाथ चंदने, रावसाहेब सिनगर, कुंडलिक घुले, विजय सिनगर, फकीरचंद जेऊघाले, अशोक मंचरे, राजेंद्र घनघाव, दीपक घट, शंकरराव सिनगर, सचिव गणेश बारहाते, मधुकर सिनगर आदींसह संस्थेचे आजी-माजी संचालक, सभासद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोल्हे म्हणाले, कै. सीताराम व्यंकटराव सिनगर यांनी शेतकरी व सभासदांमध्ये सहकाराबद्दल जागृती करून सहकार क्षेत्रात व गावाच्या विकासासाठी मोठे काम केले. कै. सीतारामबापूंचे पुतणे व भोजडे नं.२ विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे अध्यक्ष मुकुंदराव सिनगर हे गेल्या ११ वर्षांपासून त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दरवर्षी आदर्श सभासद पुरस्कार देऊन सभासदांचा सन्मान करत आहेत. त्यांनी सुरू केलेला हा उपक्रम अभिनंदनीय आहे. त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत या संस्थेचा कार्यभार हाती घेतला व अवसायनात जाणारी ही संस्था चांगल्या प्रकारे चालवून नफ्यात आणली आहे. सहकारी संस्था चालवताना अनेक अडचणी येतात; पण त्यावर मात करून ते ही संस्था यशस्वीपणे चालवत आहेत.

भारतात अहमदनगर जिल्ह्यातच सर्वप्रथम सहकार चळवळीचे बीज रोवले गेले. १९१६-१७ मध्ये पहिल्यांदा नगर जिल्ह्यात सहकारी संस्था चालू झाली. त्यानंतर स्व. शंकररावजी कोल्हे, स्व. शंकररावजी काळे, स्व. गणपतराव औताडे, स्व. के. जी. रोहमारे यांनी पुढाकार घेऊन कोपरगाव तालुक्यात सहकारी संस्थांचे जाळे निर्माण केले. स्व. शंकरराव कोल्हेसाहेबांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन बँकिंग, साखर कारखाना, दूध संस्था, नॅशनल हेवी इंजिनीअरिंग कॉर्पोरेशन अशा अनेक संस्था सुरू करून त्या नावरूपाला आणल्या.

या कार्यक्रमात विवेक कोल्हे यांना नवभारत ग्रुपचा ‘यंग प्रॉमिसिंग पॉलीटिशीयन ऑफ द इयर’हा पुरस्कार मिळाल्याबद्दल भोजडे नं.२ विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष मुकुंदराव सिनगर, उपाध्यक्ष दिनकर सिनगर व सर्व संचालकांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीण भागाच्या व शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी अथक प्रयत्न केले. सहकार चळवळ वाढविण्यासाठी स्व. कोल्हेसाहेब कायमच झटत राहिले. त्यांनी शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्याचे कार्य सहकाराच्या माध्यमातून केले. सहकारी संस्था यशस्वीरीत्या चालवून त्यांनी देशाला आदर्श घालून दिला आहे, असेही ते म्हणाले. 

इतिहासात डोकावले तर महाराष्ट्रात शासनाच्या धोरणामुळे सहकार चळवळ अडचणीत आल्याचे दिसून येते. आज खाजगी संस्थांमुळे स्पर्धा वाढली आहे. गुजरातमध्ये जागतिक दर्जाच्या ‘अमूल’ कंपनीसह सर्व सहकारी साखर कारखाने व अन्य संस्था आजही चांगल्या प्रकारे चालू असून, आपल्याकडे वेगळी परिस्थिती आहे. महाराष्ट्रातील अडीचशे साखर कारखान्यांपैकी शंभरेक कारखाने कसेबसे तग धरून आहेत. अनेक दूध संस्था बंद पडल्या, अनेक विविध कार्यकारी संस्था अवसायनात आल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ७५ वर्षांनंतर देशात प्रथमच सहकार मंत्रालयाची स्थापना केली आहे. पंतप्रधान मोदी व देशाचे पहिले केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी स्वीकारलेल्या नवीन सहकार धोरणामुळे सहकारी साखर कारखानदारीला नवसंजीवनी लाभली आहे.

देशातील सर्वाधिक २१ हजार प्राथमिक कृषी सहकारी संस्थांना (पॅक्स) महाराष्ट्रात आहेत. देशातील ३ लाखांहून अधिक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांचे संगणकीकरण व बळकटीकरण करून त्यांना नागरी सेवा केंद्राप्रमाणे बहुपयोगी करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. त्यांना विविध १५१ व्यवसाय सुरू करण्याची व तीनशेहून अधिक सेवा देण्याची परवानगी सरकारने दिली असून, कोपरगाव मतदारसंघातील सर्व सहकारी सोसायट्यांनी उत्पन्नवाढीसाठी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कोल्हे यांनी केले.