कोपरगाव प्रतिनिधी, दि. २९ : विकास कामांना निधी मिळविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर निधी मिळत असून मिळणारा निधी वारंवार मिळत नाही. त्यामुळे नियोजित इस्टीमेटप्रमाणेच काम करा. चुकीच्या ठिकाणी निधीचा वापर करू नका. निधीचा दुरुपयोग झाल्यास गाठ माझ्याशी आहे हे विसरू नका असा गर्भित ईशारा आ. आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला.
माजी आमदार अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात उभारण्यात आलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) इमारतीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे विद्यार्थ्यांना जुन्याच इमारतीत प्रशिक्षण घ्यावे लागत होते. त्याची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या इमारतीसाठी व कार्यशाळेसाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा करून ७.६६ कोटी निधी मंजूर करून आणला आहे.
या निधीतून सुरु असलेल्या कामाची आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. त्यावेळी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेवून त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.
औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय) इमारतीचे काम सुरु असतांना विद्यार्थ्यांना व शिक्षकांना आवश्यकता असणारी कामे होत नसल्याचे आ. आशुतोष काळे यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी सुरु असलेल्या कामाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून निधी चुकीच्या कामासाठी न वापरण्याच्या सूचना दिल्या. झालेल्या कामात सुधारणा करून घ्या.
आवश्यक असेल त्या ठिकाणी इस्टीमेटमध्ये बदल करून घ्या मात्र होणारे काम उच्च दर्जाचे होवून त्या कामांचा विद्यार्थ्यांना व शिक्षकांना उपयोग होईल याची काळजी घेवून निधीचा योग्य उपयोग करा. निधीचा दुरुपयोग झाल्यास गाठ माझ्याशी असल्याचा ईशारा दिल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य पद्धतीने काम करणार असल्याची ग्वाही आ.आशुतोष काळे यांना यावेळी दिली.
महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, हाजीमेहमूद सय्यद, दिनकर खरे, कृष्णा आढाव, रमेश गवळी, अजिज शेख, सचिन गवारे, शैलेश साबळे, संदीप कपिले, किशोर डोखे, दिनेश पवार, निलेश रुईकर, राजेंद्र खैरनार, विजय शिंदे, मंगेश देशमुख, दिलीप गोसावी, राजेंद्र बोरावके, सचिन बोरावके, सार्वजनिक बाधकाम विभागाचे चौधरी, रायते पी.एन., गुठ्ठे ए.बी.,पाटील के.एस., आव्हाड बी.बी. आदी उपस्थित होते.