कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ : ९ ऑगस्ट २०२४ रोजी कोपरगाव नगरपरिषदेने स्वातंत्र्य दिनानिमित्त सुरु असलेल्या हर घर तिरंगा अभियानाची जनजागृती करिता मोठ्या उत्साहात तिरंगा बाईक रॅली मुख्याधिकारी सुहास जगताप यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा अभियान दि. ९ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२४ या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अभियाना अंतर्गत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. जसे की तिरंगा रॅली, तिरंगा यात्रा, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा कॅनव्हॉस, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा ट्रिब्यूट, हर घर तिरंगा आणि ध्वजारोहण कार्यक्रम यासारख्या कार्यक्रमाच्या आयोजनातून आपल्या शहरामध्ये आपल्या देशाविषयी जनजागृती, प्रेम आणि साक्षरता निर्माण व्हावी व या मातृभूमिसाठी झटणारे तसेच त्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर वीरांचा सन्मान व्हावा याकरिता सदर अभियान राबविण्यात येत आहे.
त्यानुसार आज नगरपरिषद कार्यालय ते भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक ते छत्रपती संभाजी महाराज चौक ते एस.जी.विद्यालय ते गांधीनगर व नगरपरिषद कार्यालय अशी बाईक रॅली काढण्यात आली. तसेच बाईक रॅलीच्या सुरुवातीस तिरंगा प्रतिज्ञा घेण्यात आली.
देशाच्या स्वातंत्र्यासाठी अनेकांनी बलिदान दिले आहे. तर देशाच्या संरक्षणासाठी अनेक वीर सैनिकांना हौतात्म्य पत्करावे लागले आहे. त्या सैनिकांचा गौरव व्हावा, त्यांच्या बलिदानाची स्मृती कायम स्मरणात राहावी याकरिता स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रत्येकाने घरोघरी तिरंगा लावण्यात यावा असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक सुहास जगताप यांनी यावेळी केले.