शेवगाव प्रतिनिधी, दि. ८ : तालुक्यातील तळणी येथे गुरुवारी ( दि.८ ) पहाटेच्या वेळी घरातील लोक झोपलेले असतांना चोरटयांनी तिन तोळे सोन्याचे दागीने व ४० हाजर रुपये रोख असा सुमारे एक लाख ९० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली आहे. पंढरीनाथ एकनाथ बडे ( वय-५४ ) राहणार तळणी ता. शेवगाव यांच्या फिर्यादीवरुन पोलीसांनी तीन अज्ञात चोरटयांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.
पंढरीनाथ बडे हे तळणी येथील बसस्थानकाशेजारी कुटूंबासह राहतात. काल बुधवारी ( दि.७ ) बडे हे मुलासह कामानिमीत्त बाहेरगावी गेले होते. तर त्यांच्या कुटूंबातील पत्नी, आई व मुले घरातील एका खोलीमध्ये झोपले होते. चोरटयांनी पहाटे ते च्या दरम्यान घरामध्ये प्रवेश करुन त्या खोलीच्या दरवाजाचा कडीकोंडा लावला. तर दुस-या खोलीमधील जुन्या लोखंडी पेटीमध्ये उचकापाचक करुन कानातील फुले, अंगठया, ओम, मनी असे तीन तोळे सोन्याचे दागीने व रोख ४० हजार रुपये असा मुद्देमाल चोरुन नेला.
चोरटे घरामधून बाहेर पडत असतांना शेजारच्यांघरातील लोकांनी पाहिले. त्यांनी आरडाओरड केली. त्या संधीचा फायदा घेवून चोरटे गंगामाई साखर कारखान्याकडील कच्चा रस्त्याने पळून गेले. आज सकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा, पो.हे.काँ. बाबासाहेब शेळके, पो.काँ. अमोल ढाळे, ठसे तज्ञ व श्वान पथक तेथे दाखल झाले. श्वानाने कच्चा रस्त्यावर अर्धा किमी पर्यंत माग दाखवला. तेथून पुढे चोरटे दुचाकीवरुन पसार झाले असा अंदाज आहे. याबाबत बडे यांच्या फिर्यादीवरुन तीन अज्ञात चोरटयांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.हे.काँ. बाबासाहेब शेळके करीत आहेत.