मोबाईल ऐवजी मुलांच्या हाती पुस्तक देणे हे शिक्षण व्यवस्थेसमोर आव्हान – करंजीकर

शेवगाव प्रतिनिधी, दि. ८ : सोशल मीडियाच्या आभासी युगात मोबाईल ऐवजी मुलांच्या हाती पुस्तक देणे हे शिक्षण व्यवस्थेसमोरील आव्हान आहे. शिक्षक पालकांनी साहित्याबद्दल मुलांमध्ये आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील असावे. असे आवाहन करून शेवगाव सारख्या ग्रामीण भागात तालुकास्तरावर राजीव राजळे मित्रमंडळ,’ बुक फेस्ट ‘ सारखे  स्तुत्य उपक्रम राबवित  वाचन संस्कृती जोपासत असल्याबद्दल प्रसिद्ध लेखक, अर्थतज्ञ सिनेअभिनेते दीपक करंजीकर यांनी  राजीव राजळे मित्रमंडळाला धन्यवाद दिले.

      येथील राजीव राजळे मित्रमंडळाच्या वतीने माजी आमदार  स्व. राजाभाऊ राजळे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या,  ‘राजीव बुक फेस्ट२०२२ ‘ चा समारोप व  जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा  करंजीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत  संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.

      करंजीकर म्हणाले, वाचनीय पुस्तकातून माणसाचे व्यक्तिमत्व घडत असते. आपला मार्ग सत्य असावा दुसऱ्याचे शिव म्हणजे कल्याण करण्याची आपली धारणा असावी तरच आपले जीवन सुंदर होईल त्यासाठी वाचन संस्कृती जोपासणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या वेगवान घडामोडींचा योग्य अर्थ समजून घेण्यासाठी विविध संदर्भ साहित्यांचे वाचन केल्यास त्यातले खरे तथ्य आपल्याला समजू शकेल. पुस्तकासाठी जे जे करता येईल ते करावे , मुलांना तसेच कुठे काही द्यायचे असेल तर पुस्तकच भेट  द्यावे.

      आमदार मोनिकाताई  राजळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या शानदार सोहळ्यास शेवगावचे भूमिपूत्र ज्येष्ठ उद्योजक मंदार भारदे, सत्कार मुर्ती माजी प्राचार्य एस.व्ही. कुलकर्णी, कृषक समाजाचे राज्याध्यक्ष बापूसाहेब भोसले, भाजपा तालुका अध्यक्ष ताराभाऊ लोढे,  उषाताई कंगनकर, नगरसेवक  गणेश कोरडे , संभाजी काटे, कचरू चोथे, महादेव पवार, केशव आंधळे मुसाभाई शेख, संदीप खरड, संदीप जावळे, डॉ नीरज लांडे, डॉ मल्हारी लवांडे,  सरपंच  दादासाहेब भुसारी, सोपानराव वडणे, सुरेशराव नेमाने, लक्ष्मण देवढे , राजेंद्र डमाळे, संदीप देशमुख, अनिल परदेशी, अनंत उकिरडे, आकाश साबळे, कैलास सोनवणे, आदी मान्यवर तसेच रोटरी क्लबचे  सदस्य आदि   मान्यवर उपस्थित होते .
         शिक्षण क्षेत्रातील  उल्लेखनीय कार्याबद्दल  भारदे विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य एस.  व्ही. कुलकर्णी यांना पाहुण्यांचे हस्ते, ‘जीवनगौरव पुरस्कार ‘  प्रदान करण्यात आला.

       यावेळी आमदार मोनिकाताई राजळे म्हणाल्या, साहित्य क्षेत्राच्या बाबतीत शेवगावचा इतिहास मोठा आहे. वर्तमान परिस्थितीतही ग्रंथ प्रदर्शनाच्या प्रतिसादावरून वाचन संस्कृती येथे रुजली असल्याचे दिसून येते. शेवगावकरांच्या उदंड प्रतिसादामुळेच सलग पाच वर्षे राजीव बुक फेस्ट हा उपक्रम यशस्वी होऊ शकला. पुस्तकामुळे माणसे घडतात .असे सांगून या स्तुत्य उपक्रमाबद्दल  त्यांनी संयोजकाचे कौतूक  केले. राजीव राजळे मित्र मंडळाचे सर्वेसर्वा महेश फलके यांनी प्रास्ताविक केले. निलेश मोरे यांनी सुत्रसंचलन केले. तर संदीप वाणी यांनी आभार मानले.