जाती धर्माच्या फेऱ्यात अडकलेला समाज प्रगती करू शकत नाही – भालचंद्र मुणगेकर 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : “समाजाची उंची मोजण्याचा एकमेव मानदंड म्हणजे स्त्रियांचा सन्मान होय. साहित्य हे समाजाची धारणा, दशा आणि समाजाला उन्नत करणारे मौल्यवान साधन होय.  ज्या देशात दारिद्र्य, बेरोजगारी, बकालपणा, शेतकरी आत्महत्या व अल्पसंख्यांकांचे सुरक्षेचे प्रश्न असून देखील तेथे केवळ जात आणि धर्माच्या फेऱ्यात  समाज अडकलेला राहतो. असा समाज कधीही प्रगती करू शकत नाही. मराठी साहित्यामध्ये ग्रामीण साहित्याबरोबरच दलित साहित्य देखील उदयास आले. 

या साहित्य प्रवाहांनी ग्रामीण भागातील गोरगरीब शेतकरी आणि दीन – दलितांना उभे राहण्याचे सामर्थ्य दिले अशा साहित्याचा आणि त्यातील मूल्यांचा मी प्रबळ समर्थक आहे.”  असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ, राज्यसभेचे माजी सदस्य व मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रोफेसर भालचंद्र मुणगेकर यांनी येथे केले. स्थानिक के. जे. सोमैया  वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात के. बी. रोहमारे पुण्यस्मरण व भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्याच्या प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे होते.

प्रोफेसर मुणगेकर पुढे म्हणाले की ” मी जन्मापासून स्त्रीवादी आहे.  आज येथे ज्यांना ग्रामीण साहित्य पुरस्कार दिले गेले, त्यांच्या साहित्यातून स्त्रियांच्या वेदना,  त्यांची दमकोंडी आणि त्यांचे प्रश्न अतिशय यथार्थपणे मांडले गेलेले आहेत.  त्यामुळे हे सर्व साहित्यिक खऱ्या अर्थाने सन्मानाचे पात्र आहेत. कै.  के. बी.  रोहमारे, त्यांचा भि. ग. रोहमारे ट्रस्ट व त्यांचे के. जे. सोमैया महाविद्यालय हे आदर्श काम करणाऱ्या संस्था आहेत.  त्यांच्या आदर्शाचे वर्णन या साहित्यिकांनी आपल्या साहित्यातून पुढे आणावे. राजकारण एक अत्यंत आदर्श कला आहे. संसदीय लोकशाहीमध्ये प्रत्येक पक्ष अनिवार्य आहे.  कारण त्यांच्या शिवाय लोकशाही चालणार नाही.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून बोलताना कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे  व भि.ग. रोहमारे  ट्रस्टचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे म्हणाले की “आज मुणगेकर  साहेबांचे प्रेरक भाषण ऐकून असे वाटले की गेली 33 वर्ष त्यांच्या भाषणाची आम्हाला प्रतीक्षा होती.  असे मौल्यवान विचारधन त्यांच्या तोंडून ऐकल्यानंतर आमच्या पुरस्कार योजनेचे खऱ्या अर्थाने सोने झाले.  यापूर्वी आर्थिक संकटांच्या काळात पुरस्काराबद्दल अनेकदा पुरस्कार पुढे चालू ठेवावा की नाही याबद्दल संभ्रम निर्माण होत होता.  परंतु फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या आग्रहामुळे आमचे मनोबल वाढले व हा उपक्रम आम्ही पुढे चालू ठेवला.  या पुरस्कार योजनेमध्ये अनेक दिग्गज ग्रामीण साहित्यिकांनी योगदान दिलेले आहे. 

आमच्या मातोश्रींच्या निधनानंतर त्यांची शिल्लक रक्कम देखील आम्ही भावंडांनी या ट्रस्टला दिली आणि  हे सेवाभावी कार्य पुढे चालू ठेवले.  पुढील वर्षापासून साहित्याबरोबरच सामाजिक,  राजकीय, औद्योगिक, शेती आणि सांस्कृतिक क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या कर्तृत्वाचा जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्याचा मानस असल्याचेही अशोकराव रोहमारे यांनी येथे सांगितले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या अतिथी शब्दालय प्रकाशनाच्या संचालक ज्येष्ठ कवयित्री सुमतीताई लांडे म्हणाल्या की,” कै.  के.  बी.  रोहमारे साहेब व त्यांचे चिरंजीव आदरणीय अशोकराव रोहमारे साहेब हे या पुरस्कार योजनेच्या माध्यमातून तसेच उच्च शिक्षण संस्थेच्या माध्यमातून समाजाची खूप मोठी सेवा करीत आहेत.  त्यांचे कार्य हे एका श्रेष्ठ साहित्यिका इतकेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन श्रीमती लांडे यांनी केले.”

पुरस्कार वितरण झाल्यानंतर साहित्यिकांच्या प्रातिनिधीक  प्रतिक्रियांमध्ये पुरस्कार प्राप्त कवी लक्ष्मण महाडिक म्हणाले की ” ग्रामीण भागातील शेतकरी जीवन जगणाऱ्या स्त्री-पुरुषांच्या व्यथांची मांडणी करता करता मला कविता सुचली.  मातीची संस्कृती ही आमची खरी संस्कृती. त्यामुळे मातीत रुजणे हे आमच्यासाठी अधिक मोलाचे आहे.  माझी ‘कुणब्याची कविता’ विद्यापीठ अभ्यासक्रमात लागल्यानंतर माझ्या कवितेचे सोने झाले अशी प्रांजळ भावना देखील महाडिक यांनी व्यक्त केली.” कादंबरीकार उत्तम बावस्कर म्हणाले की “के. बी.  साहेबांनी ग्रामीण भागातील लेखकांना लिहिते करण्यासाठी ही पुरस्कार योजना सुरू केली.  ग्रामीण साहित्यासाठी 33 वर्षापासून दिला जाणारा हा पुरस्कार म्हणजे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक घटना आहे. 

लेखकांनी समाजाचा जागल्या म्हणून लेखन केले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने ग्रामीण समाज प्रगतीपथाकडे झेपावेल.” पुरस्कार प्राप्त कवी डॉ.  सुभाष वाघमारे म्हणाले की “गावकुसाबाहेरच जगणं म्हणजे विषमतेचे जगणं जेव्हा मी अनुभवत होतो, तेव्हा माझ्यातली कविता जन्माला आली. गावात गाव नसते हो. तेथे तर खूप विषमता असते.  गाव हे आजही सरंजामी प्रवृत्तीचे द्योतक आहे.  अशा गावात माणुसकीची वागणूक न देणाऱ्या अज्ञात माणसाला कवी ‘गाव कुणाचं? ‘असा प्रश्न विचारतो.  माझी कविता ही कविता की वैचारिक गद्य अशा प्रकारची  प्रतिक्रिया ऐकून मोठे समाधान वाटते.  दलित नसून मी भारतीय आहे, असे कळकळीने सांगणारा कवी मी आहे.”

परीक्षकांच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया मांडताना प्राचार्या  डॉ.  गुंफा कोकाटे म्हणाल्या की, भि. ग. रोहमारे  होणारे ट्रस्ट व के. जे. सोमैया  महाविद्यालयाने या पुरस्कार योजनेत निवड समितीवर परीक्षक म्हणून काम करण्याचे स्वातंत्र्य आणि संधी दिल्यानंतर ग्रामीण साहित्यातील थोरांचे साहित्य वाचण्याची संधी आम्हाला प्राप्त झाली. ग्रामीण साहित्याची ही  चळवळ यापुढेही अबाधितपणे चालू राहावी.” याप्रसंगी त्यांनी आपल्या काही कविता सादर श्रोत्यांची मने जिंकली.

पाहुण्यांचे स्वागत करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.  बी.  एस.  यादव यांनी महाविद्यालयाच्या कार्यकर्तृत्वाचा संक्षिप्त इतिहास व त्यामागे के. बी.  साहेबांचे योगदानावर प्रकाशझोत टाकला.  “महाविद्यालयामध्ये गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षण देण्याचा घेतलेला सहा दशकांचा वसा आणि महाविद्यालयाची उत्तुंग भरारी पाहूनच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयास उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार दिला तर बंगलोर स्थित नॅक  या संस्थेने सलग दोन वेळा अ स्रेणी प्रदान करून महाविद्यालयाच्या नावलौकिकात मानाचा तुरा खवला आहे.  आज महाविद्यालयांमध्ये सात संशोधन केंद्र आणि त्यात 200 विद्यार्थी पीएच. डी. च्या पदवीसाठी संशोधन कार्य करीत आहेत.  ही आम्हा सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.”  भविष्यात आणखी संशोधन केंद्र सुरू करण्याचा मानस असल्याचेही प्राचार्य डॉक्टर यादव यांनी सांगितले.

कर्यक्रमाच्या प्रारंभी  सहकार्यवाह प्रोफेसर (डॉ.)  जिभाऊ मोरे यांनी भि. ग. रोहमारे   ट्रस्टची स्थापना व पुरस्कार योजनेची पार्श्वभूमी कथन करताना सांगितले की “गेल्या 33 वर्षापासून अव्याहतपणे भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार दिला जातोय.  या पुरस्कार योजनेत संयोजक आणि परीक्षकांना पूर्ण स्वातंत्र्य दिले जाते.  कुठल्याही बाह्यहस्तक्षेपाविना निवड समिती काम करते.  आज पर्यंत 165 ग्रामीण साहित्यिकांना या पुरस्काराने गौरविले गेले असून त्यातील अनेकांना इतर मोठे मानसन्मान लाभले आहेत. चालू वर्षी उत्तम बावस्कर यांना काळबाटा या उत्कृष्ट ग्रामीण कादंबरीसाठी, ज्योती सोनवणे यांना दमकोंडी या उत्कृष्ट ग्रामीण कथासंग्रहासाठी, लक्ष्मण महाडिक यांना स्त्री-पुरुषाच्या कविता व डॉ.  सुभाष वाघमारे यांना संविधानाच्या स्वप्नातलं गाव या उत्कृष्ट ग्रामीण कवितासंग्रहासाठी  विभागून तर जी. ए.  उगले व डॉ.  रामकिशन दहिफळे यांना उत्कृष्ट ग्रामीण समीक्षेसाठी विभागून भि. ग. रोहमारे साहित्य पुरस्काराचे प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मानपूर्वक वितरण करण्यात आले.

पुरस्काराचे स्वरूप रुपये १५००० /- रोख, प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह असे होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय प्रो. डॉ. विजय ठाणगे यांनी करून दिला. तर संस्थेचे विश्वस्त विधिज्ञ राहुल रोहमारे यांनी उपस्थिस्तांचे आभार मानले.  सूत्रसंचालन डॉ. शैलेंद्र बनसोडे यांनी केले. याप्रसंगी को.ता.एज्यु. सोसायटीचे सचिव विधिज्ञ संजीव कुलकर्णी, भि. ग. रोहमारे ट्रस्ट चे सचिव रमेशराव रोहमारे, संस्थेचे विश्वस्त जवाहर शहा, संदीप रोहमारे, मा. शोभाताई रोहमारे, मा. मंदाताई रोहमारे आदी अनेक सन्माननीय सदस्य उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कार्यवाह डॉ. गणेश देशमुख,  रजिस्ट्रार डॉ. अभिजित नाईकवाडे, सहकार्यवाह डॉ. संजय दवंगे, प्रो. डॉ. के. एल. गिरमकर, प्रो. डॉ. एस.एल. अरगडे, डॉ. वसुदेव साळुंके आदींनी विशेष परिश्रम घेतले.