विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा कोपरगाव भाजपतर्फे निषेध

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ४ : महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याचा कोपरगाव शहर व तालुका भारतीय जनता पक्षाने तीव्र निषेध केला आहे. अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी केलेले वक्तव्य आक्षेपार्ह असून, त्यांनी या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागावी व विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी कोपरगाव शहर व तालुका भारतीय जनता पक्षाने एका निवेदनाद्वारे तहसीलदार विजय बोरुडे यांच्याकडे केली आहे 

          याप्रसंगी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरद थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्तात्रय काले, भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे, माजी नगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, माजी नगरसेवक बबलूशेठ वाणी, दीपक जपे, सतीश चव्हाण, कैलास रहाणे, डॉ.राजकुमार दवंगे, सुनील कदम, प्रभाकर शिंदे, चंद्रकांत वाघमारे आदींसह भाजप, भाजयुमोचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. 

               या निवेदनात पुढे म्हटले आहे की, राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नुकतेच नागपूर येथे पार पडले. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने ‘बाल शौर्य पुरस्कार’ देण्याची मागणी करताना संभाजी महाराजांविषयी अवमानजनक वक्तव्य केले. 

            महाराष्ट्रात अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात नाही. ‘बाल शौर्य पुरस्कार’ हा किमान स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीदिनी द्यावा. छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, धर्मवीर नव्हते. त्यांनी धर्माचा कधीच पुरस्कार केला नाही. काहीजण जाणीवपूर्वक छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख ‘धर्मवीर… धर्मवीर…’ असा करतात. 

             संभाजी महाराजांचा उल्लेख हा स्वराज्यरक्षक असाच करावा, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली होती. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या वादग्रस्त विधाना मुळे  हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. 

           औरंगजेबाने संभाजी महाराजांना धर्मांतर करण्यासाठी सांगितले; परंतु त्यांनी मान्य केले नाही. संभाजी महाराजांनी ४० दिवस अत्याचार सहन केला. अखेर मृत्यू पत्करला; पण धर्म सोडला नाही. स्वदेश, स्वभूमी आणि स्वधर्मासाठी हालअपेष्टा सहन करून त्यांनी बलिदान दिले. अशा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अजित पवार यांनी केलेले हे विधान निषेधार्ह आहे.

             प्रत्येक वेळेस महापुरुषांचा व हिंदूंचा अवमान करतात आणि हिंदूंच्या भावनंसोबत खेळतात. अजित पवार या वक्तव्याबाबत जाहीर माफी मागावी व विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा द्यावा नाही तर यानंतर तीव्र स्वरुपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा भाजपा तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष दत्तात्रय काले व भाजपा युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष विक्रम पाचोरे यांनी दिला आहे.