समृध्दी महामार्गावर कारचा टायर फुटून अपघात, दोघांचा मृत्यु

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१७ : कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारातील स्व. बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गावर एका कारचे टायर फुटून झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला तर दोन जखमी झाले. 

 या घटनेची अधिक माहीती अशी की, नागपुर येथून नाशिकला जाण्यासाठी राजेश रहाटे त्यांची मुलगी लिना रहाटे, मेव्हणी अलका मजुलकर व मजुलकर यांची मुलगी अवंतिका हे एका वैद्यकीय कामासाठी आपल्या चारचाकी गाडीने समृध्दी महामार्गावरुन गतीमान निघाले.

शुक्रवारी दुपारच्या दरम्यान कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारात पोहचले असता अचानक गाडीचा पुढचा टायर फुटल्याने मारुती व्हिटारा ब्रिझा (क्रमांक एम.एच.४९ बी.बी.६६२०) ही गाडी वेगात महामार्गावरील दुभाजकला जोरात धडकल्याने गाडीच्या तोंडाचा भाग चक्काचूर झाला.

गाडीतील राजेश राजाराम रहाटे वय ५२ वर्षे यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या अलका मजुलकर (वय ४२) यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यांच्या सोबत असलेल्या लिना रहाटे व अवंतीका मजुलकर या दोघी गंभीर जखमी झाल्या असुन त्यांच्यावर कोपरगाव येथील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरु आहे. 

दरम्यान समृध्दी महामार्गावर अवघ्या दोन महीण्यात अनेक वाहनांचे टायर फुटून अपघात होत असल्याने हा गतीमान समृध्दी महामार्ग धोकादायक वाटत आहे. नागपुर ते कोकमठाण – शिर्डी या दरम्यान महामार्गावर कुठेही विश्रांतीसाठी जागा नाही. उन्हात अथवा लांबचा प्रवास केल्यानंतर विसाव्याची व्यवस्था नसल्याने गांड्यांचे टायर गरम होवून फुटत आहेत. खाली सिमेंटचा रस्ता आणि वरून सुर्याची आग, रस्त्यात मध्ये थांबण्यासाठी काहीच व्यवस्था नसल्याने प्रवासादरम्यान अनेक आडचणींचा सामाना करावा लागत आहे.

 माणसांना पिण्यासाठी पाणी नाही, खाण्यासाठी अन्नाची व्यवस्था नाही, ना गाडीच्या देखभाल दुरुस्तीची व्यवस्था नसल्याने एकदा महामार्गावर प्रवास सुरु झाला म्हणजे थांबायचे नाही. सलग प्रवासामुळे गाड्यांच्या टायरच्या समस्या निर्माण होवून असे अपघात घडत असल्याची माहीती पुढे आली आहे.