ज दरवाढीबाबत जास्तीत जास्त हरकती नोंदवा
कोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ : मागील दोन वर्ष आलेल्या जीवघेण्या कोरोना संकटातून सावरत असताना सर्वसामान्य नागरिकांची तसेच शेतकरी व छोट्या मोठ्या व्यवसायिकांची विस्कटलेली आर्थिक घडी बसविण्यासाठी धडपड सुरू आहे. अशा परिस्थितीत महावितरणने वीज नियामक मंडळाकडे वीज दरवाढी बाबत प्रस्ताव दाखल केलेला आहे.जर ही वीज दरवाढ लागू झाली तर सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट बिघडणार आहे. त्यामुळे ही संभाव्य वीज दरवाढ रोखण्यासाठी सर्व वीज ग्राहकांनी जास्तीत जास्त हरकती नोंदविण्याचे आवाहन करून संभाव्य वीज दरवाढ रोखण्यासाठी सामूहिक लढा देवू अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.
महावितरण कंपनीने वीज नियामक आयोगाकडे तब्बल ३७ टक्के वीज दरवाढीचा प्रस्ताव सादर केला असून या प्रस्तावाला आयोगाने मंजुरी दिल्यास वीज ग्राहकांना मोठा भुर्दंड पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर घरगुती, कृषी, व्यावसायिक व छोटे-मोठे कारखानदार यांच्याशी चर्चा करून पुढील रणनीती आखण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव येथे बैठक आयोजित केली होती या बैठकीत ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले कि, पेट्रोल, डिझेल त्याचबरोबर घरगुती गॅसचे व जीवनावश्यक वस्तूंची सातत्याने दरवाढ होत असल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बजेट कोलमडले आहे. दुसरीकडे शेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून शेतकऱ्यांच्या शेती मालाला मात्र अपेक्षित भाव मिळत नाही त्यामुळे अशा परिस्थितीत जर वीज दरवाढ झाली तर शेतकऱ्यांबरोबरच सर्वसामान्य नागरिक व छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसमोर मोठ्या आर्थिक अडचणी निर्माण होणार आहेत.
अशा परिस्थितीत संभाव्य वीज दरवाढीला हरकत नोंदविणे क्रमप्राप्त ठरणार आहे. याबाबत राज्याचे विरोधीपक्ष नेते ना.अजितदादा पवार यांच्याशी सविस्तरपणे चर्चा करून मतदार संघातील जनतेला सोबत घेवून संभाव्य वीज दरवाढी विरोधात आवाज उठवून वाचा फोडणार असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी यावेळी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व संलग्न संस्थांचे संचालक, माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य,माजी नगसेवक, मतदार संघातील शेतकरी, व्यापारी, कारखानदार व घरगुती वीज ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
१५ फेब्रुवारी पर्यंत नोंदवा हरकती — वीज दरवाढीला हरकती नोंदविण्यासाठी ऑनलाईन, ऑफलाईन पर्याय उपलब्ध असून १५ फेब्रुवारी पर्यंत जास्तीत जास्त वीज ग्राहकांनी हरकती नोंदवाव्यात.ऑनलाईन हरकत नोंदविण्यासाठी वीज नियामक आयोगाच्या https://merc.gov.in/ या संकेत स्थळावर (वेबसाईट) किंवा suggestions@merc.gov.in या इमेल आयडी वर आपली हरकत नोंदवावी. जर ऑनलाईन हरकत नोंदविण्यात अडचण येत असेल तर ऑफलाईन पर्यायाच्या माध्यमातून लेखी स्वरुपात अर्ज सादर करावा लागणार आहे. त्यासाठी मतदार संघातील सर्व वीज ग्राहकांना लेखी अर्ज उपलब्ध करून दिले जाणार असून नागरिकांना कोणत्याही प्रकारची अडचण भासल्यास संपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा.- आ. आशुतोष काळे.