समताने राष्ट्रीय जम्प रोप स्पर्धा आयोजित करून केला कोपरगावकरांचा सन्मान – विवेक कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ : ग्रामीण भागात दोरीवर उड्या मारणे हे सर्वांना माहीत आहे, पण राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर या स्पर्धांचे आयोजन करून भारतीय स्पर्धक देशाचे प्रतिनिधित्व करत असतात. ही स्पर्धा कोपरगाव तालुक्यात आयोजित करून आम्हा कोपरगावकरांचा मान राखत सन्मान केला. असे गौरवोद्गार सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी काढले.

समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये भारतीय जम्प रोप महासंघ, महाराष्ट्र राज्य जम्प रोप असोसिएशन, अहमदनगर जिल्हा जम्प रोप असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ३ फेब्रुवारी ते ५ फेब्रवारी २०२३ दरम्यान राष्ट्रीय जम्प रोप स्पर्धा २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे आणि महानंदा सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे उपस्थित होते. त्या प्रसंगी ते बोलत होते. प्रमुख पाहुण्यांचा परिचय समता स्कूलचे उपप्राचार्य समीर आत्तार यांनी करून दिला.

स्पर्धेत १६ राज्यातील ४५० स्पर्धक सहभागी झाले होते. सहभागी संघांपैकी सांघिक आणि वैयक्तिक प्रकारात मुलांमध्ये महाराष्ट्र, हरियाणा व मध्य प्रदेश या राज्यांनी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला तर मुलींमध्ये ही प्रथम क्रमांक महाराष्ट्र द्वितीय क्रमांक हरियाणा तृतीय क्रमांक मध्य प्रदेश या राज्यांनी पटकावला. डेमो सादरीकरणात मध्यप्रदेश राज्याचा प्रथम तर द्वितीय महाराष्ट्र राज्याने आणि तृतीय छत्तीसगड राज्याने मिळविला. तर महाराष्ट्र संघातील स्पर्धकांनी सर्वाधिक सुवर्ण ९८, रजत ६४, कांस्य ९३ पदके मिळविली. त्यानंतर हरियाणा राज्यातील स्पर्धकांनी सुवर्ण २४, रजत १८, कास्य १४ तसेच आंध्र प्रदेश संघातील स्पर्धकांनी सुवर्ण १९, रजत ४६, कांस्य ६८ आणि मध्य प्रदेश संघातील स्पर्धकांनी सुवर्ण २० रजत २४, कांस्य १४ पदके मिळविली.

या स्पर्धेत अनेक रेकॉर्ड ही झाले. ३ मिनिट इंडूरन्स या प्रकारात जम्प मारण्याचा ४१४ जम्पचे रेकॉर्ड होते. ते रेकॉर्ड महाराष्ट्र संघातील रुद्र तोंडवाल याने ४४८ जम्प मारत मोडीत काढले. नवीन रेकॉर्ड केल्याबद्दल त्याला अहमदनगर जिल्हा जम्प रोप असोसिएशनच्या वतीने ट्रॅक सूट आणि रोख ४ हजार रुपये रोख देण्यात आले. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने जास्तीत जास्त पदके मिळवत मुल व मुलींच्या संघाने जनरल चॅम्पियनशिप  मिळविली आहे.परिक्षक म्हणून धर्मेश परमार (गुजरात), राजेंद्र प्रसाद (तेलंगणा), आरिफ खान (राजस्थान), मुकुंद झोला (मध्य प्रदेश), उत्पल बोरा (आसाम), गोपेश चांदणी (छत्तीसगड), पवन सिंग व डॉक्टर सीमा पवनगोत्रा (जम्मू काश्मीर) म्हणून काम पाहिले.

 ते पुढे म्हणाले की, जम्प रोप हा व्यायाम प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात उपयुक्त आहे. या क्रिडा प्रकारातून टिमवर्क शिकायला मिळते. २००५ पासून या खेळाला राष्ट्रीय दर्जा दिला असून भारत देशाचे नाव उंचावण्यात या खेळाचे महत्वपूर्ण भूमिका आहे. तसेच समता इंटरनॅशनल स्कूल विद्यार्थी केंद्रित अभ्यासाबरोबर खेळांनाही प्रोत्साहन देणारी शिक्षण संस्था म्हणून देशात व परदेशात ही नावाजलेले आहे.

मनोगत व्यक्त करताना राजेश परजणे म्हणाले की, दोरीवर उड्या मारणे ही एक कला आहे. उड्या मारताना तोल जाऊ न देता वेग वेगळ्या प्रकारात उड्या मारण्याची प्रक्रिया चालू ठेवणे यांच्याकडून शिकले पाहिजे. लहान मुलांचा आणि कलेचा आदर्श काही क्षेत्रातील जनतेने घेणे महत्वाचे आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे म्हणाल्या की, जम्प रोप स्पर्धेच्या माध्यमातून सहभागी स्पर्धकांनी सादर केलेली कला ही प्रशंसनीय आहे. सहभागी स्पर्धक डिजिटल टेक्नॉलॉजीच्या युगात मोबाईलला हात न लावता सलग तीन दिवस स्पर्धेत लक्ष केंद्रीत करून यश संपादन केले कौतुकास्पद आहे. तर काहींना अपयशही आले असतील, तर खचून न जाता पुढील स्पर्धांसाठी तयारी करावी.

प्रसंगी अहमदनगर जिल्हा जम्प रोप असो.चे कार्याध्यक्ष दिलीप घोडके म्हणाले की, जम्प रोप या क्रिडा प्रकाराची ओळख नव्याने कोपरगावकरांना व्हावी, कोपरगाव तालुक्यातील खेळाडूंनी देखील या क्रीडा प्रकारात देशाचे प्रतिनिधित्व करावे या उद्देशाने विद्यार्थी केंद्रित समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्याचे निश्चित झाले. या राष्ट्रीय स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

हरियाणा जम्प रोप असो.चे सेक्रेटरी बिरसिंग आर्या मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, मी २००८ पासून जम्प रोप या क्रिडा प्रकाराशी संबंधित आहे. अनेक स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे. या वर्षीच्या राष्ट्रीय स्पर्धा एखाद्या सुशोभित मोठ्या शहरामध्ये घेतल्यासारखे वाटले. समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे व अहमदनगर जिल्हा जम्प रोप असो.चे अध्यक्ष संदीप कोयटे यांनी ३ तीन दिवस जेवणाची आणि वाहतूक तसेच राहण्याची समता इंटरनॅशनल स्कूलमध्ये उत्कृष्ट व्यवस्था केली होती.त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे.

कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व समता चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, भारतीय जम्प रोप महासंघाचे अध्यक्ष तौसिफ लारी गट शिक्षणाधिकारी शबाना शेख, भारतीय जम्प रोप महासंघाचे सचिव शाजाद खान, महाराष्ट्र जम्प रोप असो.चे मार्गदर्शक अशोक दुधारे, सचिव दिपक निकम, कार्याध्यक्ष पांडुरंग रणमाळ, संत ज्ञानेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष राजेंद्र झावरे, रेनबो इंटरनॅशनल स्कूलचे विश्वस्त आकाश नागरे, एस.एस.जी.एम. कॉलेजचे एल.एम.सी.मेंबर संदीप वर्पे, सुनील गंगुले, आकाश झावरे, शिव छञपती पुरस्कार विजेते .शेषनारायण लोढे, दिलीप घोडके, पदाधिकारी, सदस्य, स्पर्धक मोठया प्रमाणात उपस्थित होते.

स्पर्धा यशस्वीतेसाठी अहमदनगर जिल्हा जम्प रोप असोसिएशनचे पदाधिकारी, चंद्रकांत शेजुळ, बाबासाहेब गवारे, नितीन निकम, निवृत्ती मुरडणर, रोहित महाले, कार्तिक मोरे, राहुल रुईकर, सार्थक बडजाते, आर्यन घोडके, श्लोक कोताडे, मल्हार देवकर, अखिलेश ठोंबरे, अर्णव वाबळे , तन्मय साबळे, दीपक जयभाये, समता इंटरनॅशनल स्कूलचे शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन उपप्राचार्य समीर अत्तार यांनी मानले. तर उपस्थितांचे आभार शिवप्रसाद घोडके यांनी मानले.