सावळीविहीर-कोपरगाव रस्त्याचे काम मुदतीत दर्जेदार करा – आमदार काळे                     

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ७ : मागील काही वर्षापासून प्रलंबित असलेल्या सावळीविहीर-कोपरगाव रस्त्यासाठी (राष्ट्रीय महामार्ग) सातत्याने केलेल्या पाठपुराव्यातून १९१ कोटी निधी मिळविण्यात यश मिळाले आहे. या राष्ट्रीय महामार्गाचे काम दिलेल्या मुदतीच्या आत दर्जेदार करून नागरिकांना व वाहतुकीला अडचण येणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना आ.आशुतोष काळे यांनी एस.ए. यादव कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

    आमदार काळे यांनी सोमवार (दि.०६) रोजी आपल्या कार्यकर्त्यांच्या समवेत एन.एच. ७५२ जी. या राष्ट्रीय महामार्गाच्या सुरु असलेल्या सावळीविहीर-कोपरगाव रस्त्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांकडून त्यांनी सावळीविहीर ते कोपरगाव तालुक्याच्या हद्दीततील येवला नाका पर्यंत सुरु असलेल्या कामाचा आढावा घेतला. ते म्हणाले की, सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या मार्गावर लहान-मोठी अनेक खड्डे पडून रस्त्याची अक्षरश: चाळण झाल्यामुळे या मार्गावर अपघातांची संख्या वाढली होती.

या मार्गाच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी पाठपुरावा सुरु असतांना अहमदनगर-मनमाड मार्ग सावळीविहिरपासून तोडण्यात येवून सावळीविहीर फाटा, कोपरगाव ते मनमाड या मार्गाला एन.एच.७५२ जी क्रमांक देण्यात येवून सिन्नर, शिर्डी, अहमदनगर, दौंड, बारामती, पैठण ते कर्नाटक राज्यातील शिकोडी पर्यंत राष्ट्रीय महामार्ग १६० मंजूर करण्यात आल्यामुळे  सावळीविहीर फाटा ते कोपरगाव या रस्त्याचे भविष्य टांगणीला लागले होते. या रस्त्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार व केद्रीय रस्ते मंत्री ना. नितीनजी गडकरी यांच्या सहकार्याने तब्बल १९१ कोटी निधी मिळविण्यात यश मिळून आज या अतिशय महत्वाच्या असणाऱ्या रस्त्याचे काम सुरु झाल्यामुळे नागरिकांमध्ये व वाहन चालकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.

    हे काम मुदतीचे आत गुणवत्ता पूर्ण करावे. काम सुरु असतांना या महामार्गाच्या लगत असणाऱ्या गावातील नागरिकांना, शेतकऱ्यांना व वाहनधारकांना अडचण येणार नाही यासाठी योग्य उपाय योजना करा. काम सुरु असतांना लगतच्या गावातील पाणी पुरवठ्याच्या व शेतकऱ्यांच्या पाईप लाईनचे तसेच गोदावरी कालव्यांच्या वितरीकांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. काम सुरु असतांना यदाकदाचित नुकसान झाल्यास त्याठिकाणी तातडीने दुरुस्ती करा. तसेच या मार्गाने शिर्डीला जाणाऱ्या साईभक्तांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या साई भक्तांना देखील त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी.

ज्या ठिकाणी या महामार्गावर पुणतांबा चौफुली व बेट नाका या ठिकाणी बांधण्यात येणारे पब्लिक अंडरपास (भुयारी मार्ग), राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम याठिकाणी पेड्स्टल अंडरपास (भूमिगत पादचारी मार्ग) तसेच भूमिगत चाऱ्यांचे ५ भुयारी मार्ग आदीसाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे अधिग्रहण करतांना त्या प्रकल्पबाधितांना योग्य मोबदला द्या त्यांच्यावर अन्याय होवू देवू नका. काम सुरु असतांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास तातडीने माझ्याशी संपर्क करा आपणास सर्वोतोपरी मदत करीन अशी ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिली.

              यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे, संचालक सुधाकर रोहोम, शंकरराव चव्हाण, राहुल रोहमारे, प्रविण शिंदे, पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन देवेन रोहमारे, केशवराव जावळे, गौतम बँकेचे व्हा. चेअरमन धोंडीराम वक्ते, रोहिदास होन, दिपक रोहोम, अजय रक्ताटे, सुनील लोहकणे, विजय थोरात, शामराव लोहकणे, परसराम रक्ताटे, भाऊसाहेब माळशिखरे, सुनील कुहिले, संतोष लोंढे, सोपान काशीद, मच्छिन्द्र देशमुख, दिलीप शिंदे, शिवाजी वक्ते, 

कल्याण गुरसळ, दौलत वक्ते, विजय रक्ताटे, सुनील लोंढे, विरेंद्र शिंदे, विलास चव्हाण, अनिल दिघे, सार्थक लोहकणे, महेंद्र वक्ते, पांडुरंग वक्ते, बापूसाहेब वक्ते, संजय थोरात, पाटीलबा वक्ते, पंकज लोंढे, गोरक्षनाथ लोंढे, अरविंद रक्ताटे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अधिकारी बडगुजर, पंचायत समितीचे गणेश गुंजाळ, ग्रामसेवक संग्राम बोर्डे, एस.ए. यादव कन्स्ट्रक्शनचे जनरल मॅनेजर अनिलबर्गे, प्रोजेक्ट मॅनेजर अभिषेक मेनन, इंजिनिअर दिपक यादव, अजय यादव आदी उपस्थित होते.