सेनेच्या बनावट शपथ पञावरून मुंबईचे पथक कोपरगावमध्ये दाखल

कोपरगाव प्रतिनिधी दि.१२: राज्यात शिवसेनाच्या वादावरुन नवनवीन प्रकरणे पुढे येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट विरुद्ध माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे गट आमनेसामने आल्याने आता त्याची झळ थेट सामान्य शिवसैनिकांना पोहचत आहे. निष्ठावंत शिवसैनिकांना आता जनते बरोबर पोलीसांना उत्तरे देण्याची वेळ आल्याचे चिञ दिसु लागले आहे.

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे गटानं बनावट शपथपत्र दाखल केल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार उदय सामंत यांनी नुकताच केला असून याच्या तपासासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक कोपरगाव येथे दाखल झाले असून याबाबत अनेक शिवसैनिकांची चौकशी करण्यात आली असून याबाबत अधिक तपास करण्याचे काम सुरू असल्याची प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक मधुकर सानप यांनी दिली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाबद्दल तात्पुरता निर्णय जाहीर केला आहे. पुढच्या महिन्यात अंधेरी पूर्व पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनुष्यबाण गोठवण्यात आलं आहे. तसेच शिवसेना पक्षाचं नाव देखील दोन्ही गटाना पोटनिवडणुकीत वापरता येणार नाही. शिंदे गटाकडून सात लाख तर ठाकरे गटाकडून अडीच लाख शपथपत्रे सादर करण्यात आले होते.

यात महाराष्ट्रातील ४५०० बनावट शपथपत्र आढळल्या प्रकरणी गुन्हे शाखेची टीम कोल्हापूर, अहमदनगर, नाशिक आणि पालघर सोबतच इतर ठिकाणी रवाना करण्यात आली आहे. या प्रकरणात निर्मलनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुंबई गुन्हे शाखेचे पथक कोपरगाव येथे दाखल झालेले असून याबाबत आज चौकशी केली असून याबाबत उद्या देखील तपास करून अहवाल मुंबई येथे देणार असल्याची माहिती कळाली आहे.