आशा कर्मचारी व गट प्रवर्तकांचा थाळीनादचा इशारा

शेवगाव प्रतिनिधी, दि.११: तालुक्यातील आशा कर्मचारी व गटप्रवर्तकांना दिवाळी बोनस व  सणासाठी अॅडव्हान्स मानधन देण्यात यावे, करोना महामारीच्या काळात आशा व गटप्रवर्तक यांना वाढीव ३ हजार रूपये मानधन देण्याचे शासनाने जाहिर केले होते. मात्र अद्याप ते मिळालेले नाही. ही रक्कमही तातडीने मिळावी, तसेच आशा व गटप्रवर्तक यांचा शासकीय सेवेत समावेश करण्यात येवून त्यांना शासकीय कर्मचा-याचा दर्जा मिळावा, त्यांना शासकिय किमान वेतन मिळावे, याबाबत सकारात्मक  निर्णय न झाल्यास येत्या २० तारखेला पंचायन समिती कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा संघटनेच्या वतीने तहसीलदार छगनराव वाघ व सहाय्यक गटविकास अधिकारी दीप्ती गट यांना निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. 

     आशा कर्मचारी व गट प्रवर्तकांच्या विविध मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी वेळोवेळी मोर्चे, आंदोलने करण्यात आली मात्र संबधितांकडून याबाबत कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आशा व गट प्रवर्तकांच्या  या समस्यांची तातडीने सोडवणुक झाली नाही तर संघटनेच्या वतीने येत्या दि.२० ऑक्टोंबर रोजी शेवगाव पंचायत समिती कार्यालयात आशा व गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने थाळीनाद आंदोलन करण्यात येईल असा निर्धार संघटनेचे जिल्हा संघटक संजय नांगरे यांनी निवेदनाद्वारे जाहीर केला आहे.

 कॉ.नांगरे यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या तालुकाध्यक्षा विना भस्मे/नांगरे, अंजली भूजबळ, सुनेत्रा महाजन, अलका पाचे, आशा मगर, सुवर्णा देशमुख, सुनीता पाटोळे, वैशाली वाघुले, वैशाली झिरपे, संगीता रायकर, वैशाली भूतकर, अनिता भूजबळ आदींसह शहर व तालुक्यातील आशा कर्मचारी व गटप्रवर्तक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.