आयुष्यमान कार्डचा गरजू कुटुंबांना लाभ होण्यासाठी मोहीम व्यापक स्वरूपात राबवा – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२८ : समाजातील गरजू कुटुंबातील नागरिकांना मोफत उपचार मिळावेत. यासाठी महायुती शासनाने सुरु केलेल्या आयुष्यमान भारत योजनेचा जास्तीत जास्त कुटुंबांना लाभ व्हावा. यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करून जास्तीत जास्त कुटुंबांना आयुष्यमान भारत मोफत विमा योजनेचा लाभ व्हावा. यासाठी आयुष्यमान भारत कार्ड/गोल्डन कार्ड मोहीम व्यापक स्वरूपात राबवा अशा सूचना आ. काळे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

आयुष्यमान भारत योजने अंतर्गत पात्र नागरिकांना मोफत पाच लाख रुपयांचा आरोग्य विमा कवच मिळणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान कार्ड/गोल्डन कार्ड काढणे आवश्यक असून, हे कार्ड काढण्यासाठी नागरिकांना येत असलेल्या अडचणी बाबत आ. काळे यांनी मंगळवार (दि.२७) रोजी प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या वेळी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.

आयुष्यमान कार्ड/गोल्डन कार्ड मोहीम व्यापक स्वरूपात राबविणेबाबत अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना आ. आशुतोष काळे.

ते म्हणाले की, गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल मागासवर्गीय प्रवर्गातील नागरिकांना मोफत उपचार मिळावेत. यासाठी शासनाच्या वतीने आयुष्यमान भारत योजना राबविली जात, असून नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान कार्ड/गोल्डन कार्ड काढणे आवश्यक आहे. परंतु आयुष्यमान कार्ड/गोल्डन कार्ड काढण्यासाठी अनेक नागरिकांना रेशन कार्ड, आधार कार्ड बाबत काही तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे असंख्य नागरिकांना आयुष्यमान कार्ड/गोल्डन कार्ड मिळत नाही.

आयुष्यमान कार्ड/गोल्डन कार्डच्या माध्यमातून जवळपास १२०० च्या वर आजारांवर मोफत उपचार गरजू व पात्र रुग्णांना मिळणार आहे. कोपरगाव तालुक्यातील ग्रामीण भागासाठी २,०४,०५१ व कोपरगाव शहरासाठी ५३,३४२ नागरिकांचे आयुष्यमान कार्ड/गोल्डन कार्ड काढण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी २६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत ग्रामीण भागातील एकूण ६४,६३८ नागरिकांनी आयुष्यमान कार्ड काढले असून अजूनही १,३९,४१३ नागरीकांनी अद्याप आयुष्यमान कार्ड काढलेले नाहीत.

कोपरगाव शहरासाठी ५३,३४२ चे उद्दिष्ट असून एकूण ११,७३० नागरिकांनी आयुष्यमान कार्ड काढले असून अजूनही ४१,६१२ नागरीकांनी अद्याप आयुष्यमान कार्ड काढलेले नाहीत. अनेक गरजू रुग्ण आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे चांगले उपचार घेवू शकत नाही. अशा आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या रुग्णांसाठी शासनाने आयुष्यमान भारत योजनेचा अतिशय महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे उपचार घेण्यासाठी आलेला एकही रुग्ण आयुष्यमान कार्ड/गोल्डन कार्ड नसल्यामुळे मोफत उपचारापासून वंचित राहणार नाही.

यासाठी नागरिकांना येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर करून आयुष्यमान कार्ड/गोल्डन कार्ड काढण्याची मोहीम व्यापक प्रमाणात राबवावी अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी या बैठकीत दिल्या. तसेच जास्तीत नागरिकांनी आपल्या आरोग्याचा विचार करून भविष्यातील संभाव्य आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तातडीने आयुष्यमान भारत योजनेचे रुग्ण आयुष्यमान कार्ड/गोल्डन कार्ड काढून घ्यावे असे आवाहन केले आहे. यावेळी तहसीलदार संदीप भोसले, विकास गमरे, गटविकास अधिकारी सचिन सूर्यवंशी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास घोलप, उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे, आरोग्य अधिकारी डॉ. गायत्री कांडेकर, पुरवठा अधिकारी महादेव कुंभार, जोशी, माजी नगरसेवक हाजीमेहमूद सय्यद, प्रकाश दुशिंग, वाल्मिक लहिरे, भाऊराव देवकर, प्रदीप मते आदी उपस्थित होते.