आयोध्येतील श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विशेष निमंत्रित

शेवगाव प्रतिनिधी, दि. १६ : आयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटन व प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित रहाण्याचे विशेष आमंत्रण तालुक्याचे भूमीपूत्र आखेगावच्या जोग महाराज संस्कार केंद्राचे प्रवर्तक गुरुवर्य ह.भ.प. राम महाराज झिंजुर्के यांना सयोजन समितीने दिले आहे. याबाबत माहिती अशी की, वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारे शेवगाव तालुक्याचे भूषण महंत जोग महाराज संस्थांनचे ह.भ.प. राम महाराज यांना   राम जन्मभूमी अयोध्या येथे २२ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या प्रभूराम मंदिराच्या नविन भव्य वास्तू मध्ये जगभरातील साधूसंतांसह देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उपस्थितीत श्रीराम मुर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.

गुरुवर्य राम महाराज यांनी धर्म तसेच वारकरी संप्रदाय साठी केलेल्या निस्वार्थी कार्याचा हा गौरव आहे. संसारीक जीवनाच्या मोहमायेत न अडकता अतिशय त्यागमय जीवन जगण्याचा आदर्श त्यांनी लाखो तरुणांसमोर ठेवला आहे. युवा पिढीला व्यसनापासून परावृत्त करून धर्मकार्यात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करून धर्म सेवा, समाजसेवा घडवून आणण्याचे पवित्र कार्य केले आहे.

असंख्य लोकांना मदत करणारे राम महाराज यांचा हा यथोचित सन्मान झाल्याची कृतार्थ भावना त्यांच्या अनुयायांनी येथे व्यक्त केली आहे. अलीकडे त्यांनी स्वतः आपल्या अनुयायासह श्रीक्षेत्र पैठणच्या दक्षिण गंगा गोदावरीची स्वच्छता मोहीम अभियान राबवल्याने संपूर्ण महाराष्ट्रात तिची चर्चा झाली. यावेळी शेवगावच्या आमदार मोनिका राजळे देखील या अभियानात सक्रीय होऊन गंगा स्वच्छता मोहिमेत सहभागी झाल्या होत्या.