कोपरगाव प्रतीनिधी, दि.२८ : दुष्काळजन्य परिस्थितीला तोंड देत असलेल्या कोपरगाव विधानसभा मतदारसंघात रविवारी रात्री मतदारसंघातील अनेक गावांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. या पावसाने अनेक ठिकाणी घरांचे तसेच पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तहसील प्रशासन व कृषी विभागाने अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी सूचना माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे.
स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, कोपरगाव विधानसभा मतदारसंघात अवकाळी पावसाने कांदा, ऊस, मका, तूर, कापूस तसेच फळ व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यामुळे बळीराजा चिंतेत आहे. राज्यातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, अवकाळी पावसामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी प्रशासनास दिलेले आहेत.
त्यानुसार प्रशासनाने कोपरगाव विधानसभा मतदारसंघात अवकाळी पावसाची झळ बसलेल्या भागाची तात्काळ पाहणी करून नुकसानीचे पंचनामे करावेत व पिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, याबाबत आपण तहसीलदार व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचित केले आहे. यंदा कमी पाऊस झाल्याने आधीच कोपरगाव विधानसभा मतदारसंघावर दुष्काळाचे सावट आहे. कोपरगाव तालुक्यासह संपूर्ण मतदारसंघात रविवारी (२६ नोव्हेंबर) रात्री अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला.
मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात मतदारसंघात मुसळधार पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी गारपीटही झाली. कोपरगाव मतदारसंघात समाविष्ट असलेल्या चितळी (ता. राहाता) परिसरात रविवारी ६७ मि. मी. पाऊस झाला आहे. अवकाळी पावसामुळे ऊस, मका, गहू, कांदा, तूर, कापूस तसेच फळ व भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतमालाबरोबरच काही घरांचेही बरेच नुकसान झाले आहे. फळबागा उद्ध्वस्त झाल्या असून, पशुधनाचीही हानी झाली आहे. सोनेवाडी व इतर काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेल्याने अनेकजण बेघर झाले आहेत.
अगोदरच दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पुरेशा पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेला असून, शेतकऱ्यांची सारी मदार रब्बी पिकांवरच अवलंबून आहे. पाऊस नसताना शेतकऱ्यांनी मेहनत करून जगवलेल्या पिकांची या अवकाळी पावसाने मोठी हानी झाली आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा मोठ्या संकटात सापडले आहेत. अनेक ठिकाणी शेतातील उभी पिके जमीनदोस्त झाली असून, शेतात पाणी साचल्याने कांदा रोपे खराब झाली आहेत. पेरू, डाळिंब, पपई व इतर फळ पिकांनाही पावसाचा जबर फटका बसला आहे.
तहसील प्रशासन व कृषी विभागाने तात्काळ अवकाळी पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळण्याच्या दृष्टीने योग्य कार्यवाही करावी. एकही बाधित शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही याची काळजी घ्यावी, अशी सूचना स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.