संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे गौरी पगारेचा सन्मान

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२८ : कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव येथील रहिवासी गौरी पगारे ही झी मराठी वाहिनीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स २०२३’ ची महाविजेती ठरली आहे. त्याबद्दल संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गौरी पगारे हिचा सत्कार करण्यात आला. झी मराठी वाहिनीवर ‘सा रे ग म प लिटिल चॅम्पस् २०२३’ या रिअ‍ॅलिटी शोचा महाअंतिम सोहळा नुकताच पार पडला. या पर्वाच्या अंतिम फेरीत ब्राह्मणगावची सुकन्या गौरी पगारे हिने बाजी मारत विजेती होण्याचा मान पटकावला आहे. या अटीतटीच्या स्पर्धेत गौरी पगारे हिने एकापेक्षा एक सरस गीते सादर करून आपल्या सुरांनी संपूर्ण महाराष्ट्राचे मन जिंकले.

लहान वयातच गौरीने आपल्या मधुर आवाजाने सर्वांनाच भुरळ घातली आहे. ‘सा रे ग म प लिटिल चॅम्पस’ची महाविजेती ठरलेल्या गौरी पगारे हिने  केवळ ब्राह्मणगाव, कोपरगाव तालुक्याचाच नव्हे तर संपूर्ण नगर जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला आहे. तिच्या या अभूतपूर्व यशाबद्दल युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांनी ब्राह्मणगाव येथे गौरी पगारेच्या राहत्या घरी जाऊन तिचा सत्कार केला, व पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा दिल्या.

ब्राह्मणगाव येथील गौरी पगारे हिच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून, गौरीने अत्यंत खडतर परिस्थितीला सामोरे जात ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या रिअ‍ॅलिटी शोमध्ये विजेतेपद पटकावून नवा इतिहास रचला आहे. तिने मिळवलेले हे यश निश्चितच कौतुकास्पद असून, गौरीचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे. गौरीला सुराची दैवी देणगी व गोड गळा लाभलेला आहे. एक मोठी गायिका होण्याचे स्वप्न तिने उराशी बाळगले असून, तिचे हे स्वप्न साकारण्यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानतर्फे तिला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. -विवेक कोल्हे, संस्थापक अध्यक्ष, संजीवनी युवा प्रतिष्ठान.

याप्रसंगी ब्राह्मणगावचे सरपंच व युवा सेवक अनुराग येवले, रूपेश शिनगर, रामदास गायकवाड, पंकज कुऱ्हे, सतीश निकम, किरण साळवे, दिनेश साळवे, मंगेश साळवे, विकी शिंगाडे, सोनू पगारे, वैभव शिंगाडे यांच्यासह सर्व युवा सेवक व ग्रामस्थ उपस्थित होते. संजीवनी युवा प्रतिष्ठान हे अराजकीय व्यासपीठ असून, प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘जागवूया ज्योत माणुसकीची’ या ब्रीद्वाक्यानुसार संजीवनी युवा प्रतिष्ठान गेल्या आठ वर्षांपासून युवा सशक्तीकरण, सामाजिक एकता, पर्यावरण संवर्धन, कृषी, आरोग्य हे पाच उद्दिष्ट घेऊन नि:स्वार्थीपणे सामाजिक कार्य करत आहे.

संकटाच्या काळात नेहमीच जनतेच्या मदतीला धावून जाणाऱ्या संजीवनी युवा प्रतिष्ठानने रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तसेच कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना, रायगड जिल्ह्यातील दरडग्रस्तांना मदत करण्याबरोबर कोरोना काळात संजीवनी डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ केअर सेंटर सुरू करून हजारो रुग्णांचे प्राण वाचवले. रक्तदान, आरोग्य शिबिरे, गरीब विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप, सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा, वृक्षारोपण, २४ तास ॲम्ब्युलन्स सुविधा, जलसंधारण, ग्राम स्वच्छता, पर्यावरण संवर्धन, करिअर मार्गदर्शन, दहीहंडी, ढोल-ताशा वादन स्पर्धा, गंगा गोदावरी महाआरती, महिषासुर दहन असे विविध नावीन्यपूर्ण उपक्रम प्रतिष्ठानच्या वतीने यशस्वीरीत्या राबविले जात आहेत.

कला, संस्कृती जोपासत संजीवनी युवा प्रतिष्ठान नेहमीच नवोदित कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देत असते. ब्राह्मणगाव येथील गौरी पगारे या मुलीने अल्प वयात ‘सा रे ग म प लिटिल चॅम्पस् २०२३’ ही स्पर्धा जिंकून कोपरगाव तालुक्याचा नावलौकिक वाढविल्याबद्दल संजीवनी युवा प्रतिष्ठानने तिचा सन्मान केला.