परिस्थिती यशापासून रोखूच शकत नाही, हे गौरीने दाखवून दिले – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२८ : मनात जिद्द असली की, कोणताही अडथळा किंवा कमतरता किंवा तुमची प्रतिकूल परिस्थिती तुम्हाला यशस्वी होण्यापासून रोखू शकत नाही. हे आपल्या गौरीने दाखवून दिले, असून ‘झी’ मराठी वाहिनीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या स्पर्धेत महाविजेती ठरलेल्या आपल्या गौरीने कला क्षेत्रात कोपरगाव तालुक्याची मान उंचावली असल्याचे गौरवोद्गार आ. काळे यांनी काढले आहे.

‘झी’ मराठी वाहिनीवरील लाखो प्रेक्षकांचा आवडता असलेला लोकप्रिय कार्यक्रम ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ या स्पर्धेत तब्बल १० हजार स्पर्धकांमधून अंतिम फेरीत महाविजेती ठरलेल्या कोपरगाव तालुक्यातील ब्राम्हणगाव येथील उदयोन्मुख गायिका गौरी पगारे हिचा आ.काळे यांनी कारखाना कार्यस्थळावर यथोचित सत्कार केला. यावेळी बोलतांना आ. काळे म्हणाले की, जीवनात ध्येय प्रत्येकाला गाठायचं असतं पण त्यासाठी जिद्द, कठोर मेहनत व ध्येयाप्रती समपर्ण अत्यंत आवश्यक असते.

झी मराठी वाहिनीवरील ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ स्पर्धेची महाविजेती गौरी पगारे हिचा सत्कार करतांना आमदार काळे, समवेत व्हा.चेअरमन डॉ. मच्छिन्द्र बर्डे, संचालक मंडळ.

परिस्थितीचा बाऊ करून ध्येयापासून अनेक जन दूर जातात. परंतु परिस्थितीवर मात करून यशाला गवसणी कशी घालायची हे गौरीने दाखवून दिले, असून तिच्या या अलौकिक कामगिरीचा प्रत्येक कोपरगावकरांना सार्थ अभिमान आहे. गौरीच्या यशात तीची आई अल्का पगारे यांचे देखील तेवढेच योगदान व तेवढाच त्याग असून त्यांचा देखील या यशात मोलाचा वाटा आहे.

प्रतिकूल परिस्थितीत हे यश मिळविण्यासाठी गौरीने केलेला कठीण प्रवास थक्क करणारा आहे. तिने मिळविलेले यश ग्रामीण भागातील नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी असून या प्रेरणेतून यापुढील काळात कोपरगावच्या भूमीत अनेक कलाकार घडतील असा विश्वास आ. काळे यांनी व्यक्त करून गौरीला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी गौरी पगारे हिच्या समवेत तिची आई अल्का पगारे, तसेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे व्हा.चेअरमन डॉ. मच्छिन्द्र बर्डे, संचालक सुधाकर रोहोम, सचिन चांदगुडे, राजेंद्र घुमरे, दिलीप बोरनारे, सुभाष आभाळे, दिनार कुदळे, सुनिल मांजरे, मनोज जगझाप, अशोक मवाळ, शिवाजी घुले, श्रावण आसने, शंकर चव्हाण, विष्णू शिंदे, रोहिदास पगारे, राहुल पगारे, गणेश आहेर, बाबासाहेब जगताप, बाबासाहेब गायकवाड, राहुल सोनवणे, रामन बर्डे, रवी पिंपरकर, अशोक बनकर, पंकज वाबळे आदी उपस्थित होते.