राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डच्या संचालकपदी राजेश परजणे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२५ : केंद्र सरकारच्या अखत्यारीत संपूर्ण देशभरात दुग्ध व्यवसायाशी निगडीत असलेल्या राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड (एन. डी. डी. बी.) या संस्थेच्या संचालकपदी गोदावरी खोरे नामदेव परजणे तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांची नुकतीच निवड झाली. या संस्थेवर नियुक्त झालेले परजणे हे महाराष्ट्रातून एकमेव संचालक आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा, केंद्रीय पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री पुरुषोत्तम रुपाला यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारच्या अखत्यारीत राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड (एन. डी. डी. बी.) ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेवर देशातील वेगवेगळ्या राज्यातून संचालक नियुक्त केले जातात. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाचे अध्यक्ष म्हणून सद्या कार्यरत असलेले राजेश परजणे यांची महाराष्ट्र राज्यातून संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे.

त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे खासदार डॉ. सुजय विखे यांचे मार्गदर्शन लाभले असून राष्ट्रीय डेअरी विकास बोर्डचे चेअरमन मिनेश शहा यांनी या नियुक्तीचे पत्र नुकतेच परजणे यांना दिले आहे.

राज्यातल्या सहकार क्षेत्रात कार्यरत असलेल्या दूध संघांपैकी गोदावरी खोरे नामदेव परजणे सहकारी दूध संघ हा महाराष्ट्रात नावलौकीक असलेला संघ असून राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड (एन. डी. डी. बी.) संस्थेच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी व दुधाचे उत्पादन वाढीसाठी विविध योजना संघाने कार्यक्षेत्रामध्ये राबविलेल्या आहेत. परजणे हे गोदावरी सहकारी दूध संघाचे अध्यक्ष म्हणून सद्या कार्यरत असून महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ (महानंद) चे अध्यक्ष तसेच भारतीय राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशनचे संचालक म्हणूनही सद्या कार्यरत आहेत.

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीसह अर्थ समिती, जिल्हा नियोजन समिती, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अशा विविध समित्यांवर तसेच कॅनरा बँकेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलेले आहे. कोपरगाव येथील महिला महाविद्यालय व संवत्सर येथील नामदेव परजणे महाविद्यालयाचे कार्यकारी अधिकारी म्हणून ते सद्या कार्यरत आहेत.

राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेल्या दिल्ली येथील नॅशनल एज्युकेशन अॅन्ड व्हयुमन रिसोर्स डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन या संस्थेने सन २००५ मध्ये त्यांचा राष्ट्रीय सन्मान पुरस्काराने तर नॅशनल चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया या संस्थेनेही दुग्ध व्यवसायातील योगदानाबद्दल  उद्योगरत्न पुरस्काराने दि.२१ मार्च २०१७ रोजी त्यांना सन्मानीत केले. याशिवाय शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल दिल्लीच्याच इकॉनॉमिक ग्रोथ फाउंडेशन या संस्थेनेही भारत शिक्षारत्न पुरस्काराने त्यांना सन्मानीत केले.

गोदावरी दूध संघाच्या कामकाजात सुसूत्रता आणून आधुनिकीकरणाबरोबरच संगणकीकृत कामकाजाचा नवा पॅटर्न तयार करण्यात परजणे यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेतली गेल्याने संघाला आंतरराष्ट्रीय पातळीवरचे आय.एस.ओ. १००१/२००० आणि आय.एस.ओ. २२०००/२०१८ ही दोन मानांकने प्राप्त झालेली आहेत. या निवडीवद्ल दुगधविकासमंत्री ना. राधाकृष्ण विखे, जि.प. च्या माजी अध्यक्षा शालिनी विखे, खासदार डॉ. सुजय विखे यांच्यासह दूध उत्पादक, कर्मचारी आदिंनी अभिनंदन केले.