कोपरगाव ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार काळेंचा वरचष्मा

१७ पैकी ११ ग्रामपंचायतीवर काळेंचा झेंडा

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ६ : कोपरगाव तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुक नुकतीच पार पडली. त्यात तब्बल ११ ग्रामपंचायतीवर आमदार आशुतोष काळे यांच्या गटाचे सरपंच निवडून आले तर कोल्हे गटाने ३ ग्रामपंचायतीवर सत्ता मिळवली व दोन ग्रामपंचायतीवर पाठींबा देवून सरपंचासह सत्ता मिळवली. मुर्शतपूर व चांदगव्हाण या दोन ग्रामपंचायतीत कोल्हेचीं सत्ता आली, परंतु सरपंच पद काळे गटाकडे गेल्याने   ‘गड आला पण सिंह गेला’ अशी स्थिती झाली. 

 पोहेगाव ग्रामपंचायतीवर कोल्हे गटाच्या मदतीने शिवसेनेचे नेते नितीन औताडे यांनी सरपंचासह ग्रामपंचायत ताब्यात घेतली. जवळके येथेही कोल्हे यांनी जवरे यांच्याशी युती करून सत्ता काबीज केली तर कुंभारी येथे माजी सरपंच प्रशांत घुले यांनी काळे, कोल्हे यांचा धुव्वा उडवत सरपंचासह आपली सत्ता अबाधित ठेवली आहे. 

कोपरगाव तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी सकाळी १० वाजता तहसील कार्यालयात सुरु करण्यात आली. मतमोजणीसाठी तहसीलदार संदीपकुमार भोसले, नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांनी सर्व यंञणा सज्ज करुन ७० कर्मचाऱ्यांच्या मदतीने १२ वाजेपर्यंत मतमोजणी प्रक्रिया पुर्ण केली. त्यांना तालुका कृषि अधिकारी मनोज सोनवणे यांनी सहकार्य केले. तर कोणताही अनुचित प्रकार यासाठी पोलीस निरीक्षक वासुदेव देसले, पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता. त्यासाठी दोन पोलीस निरीक्षक, ४ पोलीस उपनिरीक्षक, २९ पोलीस व १९ होमगार्ड होते. 

दरम्यान कोपरगाव तालुक्यातील १७ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत काही ठिकाणी काळे, कोल्हे यांची युती तर काही ठिकाणी काळे, कोल्हेंनी अपक्षांना सोबत घेवून निवडणूक लढवली. पोहेगाव येथे नितीन औताडे यांनी कोल्हे यांच्याशी युती केली होती. दहेगाव बोलका येथे काळे व परजणे यांची युती झाली होती.

१७ ग्रामपंचायतचे निवडून आलेले सरपंच गावनिहाय पुढीलप्रमाणे १) चांदगव्हाण – अलका शिवाजी बाचकर, २) धोत्रे – प्रदिप विठ्ठल चव्हाण, ३) घोयगाव – वैष्णवी मयूर माने, ४) कान्हेगाव – गणेश श्रावण सोनवणे, ५) जवळके – सारिका विजय थोरात, ६) शहाजापूर – मनीषा रवींद्र माळी, ७) कारवाडी- मंगेश भानुदास लोहोकरे, ८) मंजूर – विश्वनाथ नामदेव वाळके, ९) पोहेगाव – अलका शिवाजी जाधव, १०) वारी – योगिता बद्रीनाथ जाधव, ११) लौकी – अजिनाथ बाळासाहेब खटकाळे, १२)कुंभारी- देवयानी प्रशांत घुले, १३) दहेगाव बोलका- भारत विठ्ठल चौधरी, १४)  सुरेगाव – सुमन वाल्मीक कोळपे, १५)  मुर्शतपुर –  दादासाहेब सिताराम दवंगे, १६)  बोलकी – रमेश चांगदेव बोळीज, १७ ) ब्राह्मणगाव अनुराग प्रभाकर येवले हे सरपंच पदासाठी जनतेतून निवडून आले. त्यापैकी धोञे येथील प्रदिप विठ्ठल चव्हाण हे केवळ ४ मतांनी विजयी झाले.

कोपरगाव तालुका १७ ग्रामपंचायत निवडणूक निकाल राजकीय गटानुसार सदस्य संख्या पुढीलप्रमाणे १) शहाजापूर – काळे गट ६, कोल्हे गट ३, २) बोलकी – काळे गट ०, कोल्हे गट ७, ३) धोञे – काळे गट ४, कोल्हे गट ७, ४) कान्हेगाव – काळे गट १०, कोल्हे १, ५) लौकी – काळे गट ४, कोल्हे गट ३, ६) दहेगाव बोलका – काळे परजणे  ७, कोल्हे गट ४, ७) घोयेगाव – काळे गट ६, कोल्हे गट १, ८) चांदगव्हाण – काळे गट ३, कोल्हे गट ४, ९) जवळके – जवरे, परजणे, कोल्हे गट – ५, काळे, शिंदे गट – २, १०) ब्राम्हणगाव – १ काळे गट  कोल्हे गट १२, ११) कुंभारी – काळे २, कोल्हे ३, अपक्ष घुले ६, १२) सुरेगाव – १५ काळे, कोल्हे २, १३) पोहेगाव – काळे गट ६ – औताडे – कोल्हे गट ९, १४) वारी – काळे ८, कोल्हे ६, अपक्ष ३, १५) मंजुर – काळे ५, कोल्हे ४, १६) कारवाडी – काळे ८ कोल्हे १, १७) मुर्शतपूर – काळे ३ कोल्हे ८ सदस्य निवडून आलेत.

वारीच्या प्रभाग क्रमांक १ मध्ये सुनिता सतिश कानडे व राधिका भगवान पठाडे यांना समान ४८८ मते पडल्याने त्यांची चिठ्ठी काढण्यात आली. त्यात  राधिका पठाडे ह्या विजय झाल्या. तर मुर्शतपूर येथील प्रभाग क्रमांक ३ मधील संगिता सुधीर झगडे व सविता सुनिल दवंगे यांना समान २४३ मते पडल्याने त्यांची चिठ्ठी काढली असता संगिता झगडे विजयी झाल्या. निवडून प्रक्रिया शांततेत पार पडली कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. तालुक्यातील १७ गावांमध्ये दिवाळी अगोदरच फटाक्यांची आतिषबाजी सुरु झाली. आमदार आशुतोष काळे यांच्या संपर्क कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला.