राष्ट्रवादीच्या मागणीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तातडीने दखल – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी. दि.१६ : आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरासाठी दिलेल्या निधीतील रस्त्यांची कामे रखडल्यामुळे नागरिकांना त्रास होत होता. नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून कोपरगाव शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला तातडीने रस्त्यांची कामी सुरु करणेबाबत लेखी निवेदन दिले होते.

या निवेदनाची दखल घेण्यात आली असून कोपरगाव शहरातील २.२८ कोटीच्या रस्त्यांच्या कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. रस्त्याच्या कामाच्या निविदा प्रसिद्ध झाल्यामुळे लवकरच रस्त्यांच्या कामांना प्रारंभ होणार असून नागरिकांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

कोपरगाव शहराच्या रखडलेल्या रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी शहरातील विविध रस्त्यांसाठी निधी दिलेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर रस्त्यांच्या कामांना प्रारंभ व्हावा अशी सर्वसामान्य नागरिकांची अपेक्षा होती. मात्र, निधी मंजूर असूनहि रस्त्यांची कामे सुरु होवू न शकल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.

याची दखल घेवून निधी मंजूर असलेल्या रस्त्यांच्या कामांना लवकरात लवकर सुरुवात करावी असे लेखी निवेदन मागील आठवड्यात शुक्रवार (दि.१२) रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता रविंद्र चौधरी यांनी देण्यात आले होते.त्यावेळी शाखा अभियंता रविंद्र चौधरी यांनी लवकरात लवकर रस्त्यांच्या कामांना प्रारंभ केला जाईल अशी ग्वाही राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना त्यांनी दिली होती.

दिलेल्या ग्वाहीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पूर्तता करण्यात आली असून कोपरगाव शहरातील नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्र.०७ मध्ये धारणगाव रोड ते मार्केट यार्ड अप्रोच रोड (बैल बाजार रोड) चे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, कोपरगाव नगरपालिका हद्दीतील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे खुले नाट्यगृह (धारणगाव रोड) ते मुंदडा बिल्डिंगपर्यंत रस्ता डांबरीकरण करणे. नगरपरिषद हद्दीतील क्र.०१ मध्ये समता नगर भाग अंतर्गत लोखंडे घर ते साई सिटी चरापर्यंतच्या रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरण करणे.

कोपरगाव नगरपालिका हद्दीतील टाकळी नाका (निवारा कॉर्नर) ते माऊली अॅग्रोपर्यंतचा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे. गोदावरी पेट्रोलपंप ते समता (टेनीटोय) स्कूल रोड (मार्केट रोड) मजबुतीकरण व डांबरीकरण करणे या सर्व रस्त्यांच्या एकूण दोन कोटी सत्तावीस लाख एकोणसत्तर हजार अशी एकूण जवळपास २.२८ कोटीची निविदा नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.

त्याबद्दल कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार मानले आहे. सबंधित रस्त्यांमुळे नागरिकांना येणाऱ्या अडचणी व होणाऱ्या त्रासाची दखल घेवून सार्वजनिक बांधकाम विभागाला जाणीव करून दिल्यामुळे कोपरगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे नागरिकांनी कौतुक केले आहे.