शेवगाव प्रतिनिधी, दि. १२ : येथील न्यू आर्ट्स कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयातील ग्रंथालय विभागात ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या १३२ जयंतीनिमित्त राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या प्रतेमेला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
ग्रंथापाल प्रा. मिनाक्षी चक्रे म्हणाल्या, भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ. एस.आर.रंगनाथन यांचा जन्मदिन राष्ट्रीय ग्रंथपाल दिन म्हणून साजरा केला जातो. देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडे विनामुल्य खुली करण्याचा विचार सर्वप्रथम डॉ. रंगनाथान यांनी मांडला. त्यासाठी त्यांचे सर्व आयुष्य झिजवले. शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षण किती महत्वाचे आहे, हे पटवून देवून समाजाला साक्षर व सुशिक्षित करण्यासाठी ग्रंथालयासारखे दुसरे मध्यम नाही हे ओळखून डॉ. रंगनाथन यांनी १९२८ साली मद्रास ग्रंथालय संघाची स्थापना केली. या ग्रंथालय संघाचे कायद्याने संरक्षण व्हावे म्हणून सार्वजनिक ग्रंथालय कायदा अस्तित्वात आणला.
डॉ. रंगनाथन रावसाहेब, डिलिट, पद्मश्री आदी पुरस्कारांनी सन्मानित आहेत. या दिनाचे औचित्य साधुन महाविदयालयात आयोजित विविध विषयाच्या महत्वाच्या ग्रंथाच्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी शेवटी केले. उपप्राचार्य डॉ. सुडके यांनीही मार्गदर्शन केले. डॉ. संदीप मिरे, प्रा. मोहन वेताळ, प्रा. विजय देवरे आणि सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ग्रंथ प्रदर्शनास भेटी दिल्या. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. चक्रे, बाळासाहेब आठरे, नंदू बर्डे, यांनी प्रयत्न केले.