कोपरगाव प्रतिनिधी, दि. १६ : काळे पिता-पुत्रांमुळेच कोपरगाव तालुक्याला गोदावरी कालव्यांद्वारे मिळणारे हक्काचे पाणी कमी झाले आहे. सन २००५ मध्ये तुमच्याच पक्षाचे म्हणजे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर असताना समन्यायी पाणी वाटप कायदा मंजूर झाला. त्यावेळी तुमचे वडील अशोकराव काळे हे आमदार असताना त्यांनी या कायद्याला मूकसंमती दिली होती. मागील अडीच वर्षे तुमच्या पक्षाचे (महाविकास आघाडी) सरकार असताना तुम्ही हा कायदा रद्द व्हावा, यासाठी आवाज उठवला नाही. आता राज्यात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर असताना तुम्ही शेतकऱ्यांच्या हिताचा खोटा कळवळा आणत आहेत, अशी खरमरीत टीका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम यांनी आ. आशुतोष काळे यांच्यावर केली आहे.
रोहोम यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कोपरगाव तालुक्याला गोदावरी कालव्यांद्वारे पिण्यासाठी व शेती सिंचनासाठी मिळणारे हक्काचे पाणी कमी होण्यास माजी आमदार अशोकराव काळे व विद्यमान आमदार आशुतोष काळे हेच जबाबदार आहेत. आता तेच आ. आशुतोष काळे हे गोदावरी कालव्यांच्या पाण्याचा प्रश्न विधानसभेत मांडून आपल्याला कोपरगाव तालुक्यातील जनतेविषयी विशेषतः शेतकऱ्यांप्रती खोटा कळवळा दाखवत आहेत. समन्यायी पाणी वाटप कायद्याला व दारणा धरणातून येवला तालुक्यातील ४० गावांना पाणी देण्यास मूकसंमती देणाऱ्यांना गोदावरी कालव्यांच्या लाभधारक शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचा साक्षात्कार आता झाला आहे. हे निव्वळ हास्यास्पद आहे.
सन २००५ मध्ये राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर असताना समन्यायी पाणी वाटप कायदा मंजूर करण्यात आला. या कायद्यातील तरतुदीनुसार मराठवाड्यातील पैठणचे जायकवाडी धरण जोपर्यंत ६५ टक्के भरत नाही तोपर्यंत वरच्या भागातील दारणा, गंगापूर व इतर धरणातून जायकवाडीत पाणी सोडले जाते. अगोदरच दारणा व गंगापूर धरणांवर बिगरसिंचनाचे आरक्षण मोठ्या प्रमाणावर आहे. त्यात वरच्या धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडल्यामुळे गोदावरी कालव्यांच्या आवर्तनातून कोपरगाव तालुक्याला मिळणाऱ्या हक्काच्या पाण्यावर गदा आली आहे.
२००५ साली समन्यायी पाणी वाटप कायदा मंजूर झाला तेव्हा जलसंपदा खाते हे राष्ट्रवादी काँग्रेसकडे होते. त्यावेळी आमदार असलेल्या अशोकराव काळे यांनी कोपरगाव तालुक्याच्या हितासाठी समन्यायी पाणी वाटप कायद्याला विरोध करणे गरजेचे होते; पण त्यांनी कोपरगाव तालुक्याच्या हिताचा कसलाही विचार न करता या कायद्याला मूकसंमती दिल्यामुळे कोपरगाव तालुक्याला गोदावरी कालव्यांद्वारे पिण्यासाठी व शेती सिंचनासाठी मिळणारे पाणी मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे.
इतकेच नव्हे तर दारणा धरणातून येवला तालुक्यातील ४० गावांना प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसाठी २.६८ दशलक्ष घनमीटर पाण्याचे आरक्षण मंजूर झाले तेव्हा त्यांचे सुपुत्र आणि तालुक्याचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनीदेखील मौन बाळगले. आधी समन्यायी पाणीवाटप कायदा आणि त्यानंतर दारणा धरणातून येवला तालुक्यातील ४० गावांना पाणी देण्यास काळे पिता-पुत्रांनी दिलेली मूकसंमती यामुळे कोपरगाव तालुक्याला पिण्यासाठी आणि शेती सिंचनासाठी मिळणारे पाणी कमी झाले आहे. ओव्हर फ्लोचे पाणीदेखील शेतकऱ्यांना मिळत नाही. या पाण्याच्या तुटीमुळे कोपरगाव तालुक्यातील व गोदावरी कालव्यांच्या लाभक्षेत्रातील शेतकरी देशोधडीला लागले आहेत.
रोहोम यांनी म्हटले आहे की, काळे कुटुंबीयामुळेच कोपरगाव शहर व तालुक्याला मिळणारे हक्काचे पाणी कमी झाले आहे हे तालुक्यातील जनतेला चांगल्या प्रकारे माहीत आहे. कोपरगाव तालुक्याचे हक्काचे पाणी घालवणारे आ. आशुतोष काळे आपली निष्क्रियता लपवण्यासाठी आता शेतकऱ्यांविषयी आपल्याला किती तळमळ आहे हे दाखवत आहेत. हा प्रकार म्हणजे मगरीचे अश्रू ढाळण्यासारखा आहे. गेल्या तीन वर्षांत आ.आशुतोष काळे यांना कोपरगाव विधानसभा मतदारसंघात कोणतेही ठोस विकासकाम करता आले नाही ही वस्तुस्थिती आहे. मतदारसंघातील जनता पाणी, रस्ते, आरोग्य व इतर अनेक समस्यांनी हैराण झाली आहे.
कोपरगाव मतदारसंघात आजपर्यंत झालेली विकासकामे कोणी केली, कुणाच्या प्रयत्नामुळे जनतेचे प्रश्न सुटले हे जनतेला चांगले ठाऊक आहे. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी विकासाची असंख्य कामे करून कोपरगाव तालुक्याचा कायापालट घडवून आणला. त्यांचा आदर्श घेऊन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे, युवा नेते विवेक कोल्हे हे मतदारसंघाच्या विकासासाठी काम करत आहेत. कोपरगाव तालुक्याच्या पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न तसेच जनहिताचे इतर प्रश्न सोडविण्यासाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करत आहेत, तर दुसरीकडे आ. काळे हे प्रसिद्धीसाठी रोज नव्याने जनतेची दिशाभूल करत आहेत, अशी टीका साहेबराव रोहोम यांनी केली आहे.