शेवगाव तालुक्यात जलजीवन योजनेच्या कामाची पायमल्ली

शेवगाव प्रतिनिधी, दि.२८ : केंद्र सरकारने ग्रामीण भागातील कुटुंबांना नळ कनेक्शनद्वारे वाड्या वस्त्यांवर पुरेसे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी जलजीवन योजना राबवून कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला ५५ लिटर पाणी पुरविण्याचे नियोजन केले आहे. मात्र, शेवगाव तालुक्यात या योजनेअंतर्गत होत असलेल्या कामांमध्ये ठेकेदार निष्क्रियता दाखवून बोगसपणे काम उरकीत असल्याच्या तक्रारी आहेत.

तालुक्यातील चेडे चांदगाव येथील जलजीवन योजनेअंतर्गत होत असलेल्या कामांमध्ये ठेकेदारानी पाण्याच्या टाकीचे काम तसेच पाईपलाईंनचे काम बोगस केल्याने तेथील ग्रामस्थांनी गटविकास अधिकारी राजेश कदम यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. गेल्या दिड ते दोन वर्षापासून या योजनेच्या पाण्याच्या टाकीचे काम चुकीच्या पद्धतीने चालू असल्याने वरिष्ठांनी याकडे लक्ष केंद्रित करून बोगसपणे होत असलेल्या कामात लक्ष घालावे अशा प्रकारची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

चेडे चांदगाव येथील ग्रामस्थांनी जलजीवनच्या कामा संदर्भात आमच्या कार्यालयाकडे तक्रार अर्ज केला आहे. त्या अनुषंगाने झालेल्या टाकीचे काम हे टेक्निकली बाब असल्याने ते काम पूर्णपणे पाडून नव्याने काम सुरू करणार आहोत. तसेच पाईपलाईनच्या खोदकामा संदर्भात आलेल्या तक्रारीची योग्य ती चौकशी करून दुरुस्ती संदर्भात सूचना देण्यात येतील. तसेच मी स्वतः त्या कामाला भेट देऊन कामाची पाहणी करणार आहे. राजेश कदम गट विकास अधिकारी शेवगाव. 

सध्या तालुक्यातील बहुतांशी गावात सुरू असलेल्या शासनाच्या जलजीवन मिशन योजनेची कामे ठेकेदार व अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराचे कुरण ठरली असल्याचा स्पष्ट आरोप ग्रामस्थ करत आहेत. या योजने अंतर्गत सुरू असलेल्या पाईपलाईनच्या खोदकामामुळे गावातील सुस्थितीत असलेली विविध योजनेच्या पाईपलाईन ठिकठिकाणी तुटल्याने पाणी पुरवठाही विस्कळीत झाला आहे. काही ठिकाणी लवकर काम उरकण्यासाठी नियमांना फाटा देत रस्त्याच्या अगदी जवळून साइडपट्टी खोदत पाइप टाकले तर काही ठिकाणी डांबरी रस्ता जेसीबीने उखडून टाकला आहे.

रस्त्याच्या लगतच खोदकाम केल्याने रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे. त्यामुळे परीसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत. तालुक्यात ३७ ठिकाणच्या जलजीवन योजनेची कामे सध्या सुरु असून ती कामे काही ठराविक ठेकेदारानाच दिली असल्याने त्यांचे कामांच्या दर्जाकडे लक्ष नसल्याच्या तक्रारी असून निर्धारित मुदतीत त्याचेकडून कामे पूर्ण होण्याबद्दलची साशंकता व्यक्त केली जात आहे. या योजनेतील प्रक्रियेत पारदर्शकता न राबवल्याने अनेक योजनांची कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याच्या तक्रारी शेवगाव तालुक्यातील विविध गावातील ग्रामस्थ करत आहेत.