चितळीचे उपसरपंच कदम यांच्यासह विखेंच्या अनेक कार्यकर्त्यांचा कोल्हे गटात प्रवेश

राहाता प्रतिनिधी, दि. १४ : तालुक्यातील चितळी येथील विद्यमान उपसरपंच नारायणराव कदम यांच्यासह विखे पाटील गटातील अनेक कार्यकर्त्यांनी गणेश सहकारी साखर कारखान्याचे मार्गदर्शक तथा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कोल्हे गटात प्रवेश केला आहे. विवेक कोल्हे यांनी या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत केले.

नारायणराव कदम हे चितळी ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच असून, त्यांच्यासह चितळी गावातील विखे पाटील यांच्या गटाचे कार्यकर्ते शिवाजीराव कदम, किसनराव वाणी, छबुराव खरात, अविनाश भंडारी, कृष्णा इंगळे, मयूर शिंदे, यशवंतराव झडे, फकिरा गायकवाड, जयवंतराव टरले, विजय वाबळे, पंकज शिंदे, कारभारी शिरगिरे, थोरात मामा, रवींद्र काळे, रोहित आढाव आदी असंख्य कार्यकर्त्यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोल्हे गटात प्रवेश केला. 

माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांनी गणेशनगर येथील श्री गणेश सहकारी साखर कारखान्याला संजीवनी देऊन या भागातील शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी निर्माण करण्याचे काम केले आहे. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी कोल्हे परिवार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे.

युवा नेते विवेक कोल्हे यांनी स्व. शंकरराव कोल्हेसाहेब यांचा वारसा पुढे चालवत संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश सहकारी साखर कारखान्याला ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्याचे काम हाती घेतले आहे. विवेक कोल्हे हे कल्पक व अभ्यासू नेतृत्व असून, त्यांना विकासाची दूरदृष्टी आहे. त्यामुळे आपण यापुढील काळात त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत, अशा भावना नारायणराव कदम यांनी यावेळी व्यक्त केल्या.

माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या स्मरणार्थ संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या वतीने युवा नेते विवेक कोल्हे यांच्या संकल्पनेतून ‘मोफत फिरता दवाखाना’ हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, फिरत्या रुग्णवाहिकेद्वारे गावोगावी तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य सेवा पुरवली जात आहे. आज चितळी येथे ‘मोफत फिरता दवाखाना’ चे ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले. या मोफत फिरत्या दवाखान्यास नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. लोकांच्या सुदृढ आरोग्यासाठी विवेक कोल्हे यांनी सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे. या मोफत फिरत्या दवाखान्यामुळे गोरगरीब नागरिकांना मोठा आधार मिळाला असून, नागरिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे, असे विक्रम वाघ यांनी सांगितले.