भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे खरे भारताचे निर्माते व राष्ट्र उभारणीकर्ते – प्रा.सुभाष रणधीर

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : २१०० वर्षापूर्वीपासून प्रवाह-पतीत अशा मनूव्यवस्थेचा पगडा असलेला भारत देश हा विविध जाती धर्मात विखुरलेला देश होता. ‘ब्राह्मण’ आणि ‘श्रमण’ असे दोन मुख्य वर्ग असलेल्या या देशाला रूढीग्रस्ततेने वेढलेले होते. त्यामुळे ब्रिटिश राजवटीचे आगमन ही या देशासाठी प्रबोधनाची पहाट ठरली.

कारण या राजवटीत शाळा व शिक्षणाची सोय झाली. शाहू, फुल्यांद्वारे सामाजिक सुधारणांची सुरुवात झाली. आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारख्यांचा त्यातूनच उदय झाला. “ कोलंबिया विद्यापीठातून शिक्षण व संशोधन घेतलेल्या डॉ.आंबेडकरांनी आर्थिक समतेशिवाय राजकीय समता उपयोगाची नाही हे मनोमन
जाणले होते. म्हणूनच त्यांनी सर्व घटकांचा विचार करून स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या चतु:सूत्रीचा अवलंब करणाऱ्या भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार केला आणि खऱ्या अर्थाने नव-भारताचे निर्माते व राष्ट्रउभारणी कर्ते असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारताचे शिल्पकार ठरले.” असे प्रतिपादन प्रा. सुभाष रणधीर यांनी केले.

येथील एस. एस. जी. एम. महाविद्यालयात “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर” यांची १३२वी जयंती नुकतीच साजरी करण्यात आली, त्याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. रणधीर बोलत होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अर्थव्यवस्था’ या विषयावर आपले विचार मांडताना त्यांनी पुढे सांगितले की, डॉ. आंबेडकर
स्वतःच्या ज्ञानाने तेज-सूर्य झालेले महापुरुष होते. म्हणूनच कोलंबिया विद्यापीठात त्यांचा पुतळा उभारला गेला आहे.

स्वतंत्र भारताचे पहिले ‘कायदामंत्री’ म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मोठे कार्य केले. त्यावेळी ‘एक रुपया बरोबर एक डॉलर’ अशी भारतीय अर्थव्यवस्था स्थिती होती. त्यानंतर कोलमडलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेला सावरण्याच्या दृष्टीने उपाययोजना करताना तत्कालीन ‘भारतीय रिझर्व बॅंकेचे’ गव्हर्नर मनमोहन सिंगांनी देखील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘प्रॉब्लेम ऑफ इंडियन इकॉनोमी अँड सोल्युशन’ या ग्रंथाचा आधार घेतलेला आहे.

डॉ.आंबेडकरांचे अर्थविषयक विचार कामगार, स्त्रिया,शेतकरी अशा सर्वच घटकांना न्याय देणारे आहे.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य डॉ.रमेश सानप यांनी भूषविले. अध्यक्षीय भाष्य करताना त्यांनी, “रूढी-परंपरा,भेदाभेद यात समाज भरडला जात असताना आंबेडकरांनी निर्माण केलेल्या राज्यघटनेचे महत्त्व सांगून,कोलंबिया विद्यापीठातील पुतळा ही त्यांच्या महानत्त्वाची व कार्याची पावती असल्याचे सांगितले.”

भारतीय लोक ज्ञानाच्या जोरावर कुठेही राज्य करू शकतात.याचा जणू वस्तूपाठच डॉ.आंबेडकरांनी घालून दिला. म्हणूनच ‘ऋषी सूनक’ सारखे अनेक भारतीय जगभरात विविध उच्चपदांवर कार्यरत आहेत. असे
सांगून डॉ. सानप यांनी महामानव डॉ.आंबेडकरांचा आदर्श सर्वांनीच गिरवावा,असे आवाहन केले.

र्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बी. आर. शेंडगे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रा. किरण पवार यांनी मानले. प्रा. देवकाते यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमासाठी वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य प्रा. रामभाऊ गमे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,कार्यालयीन अधीक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.