भ्याड हल्ल्याची पाकिस्तानला किंमत मोजावी लागणार – स्नेहलताताई कोल्हे

अनंतनागमधील दहशतवादी हल्ल्यातील शहीद भारतीय जवानांना संजीवनी उद्योग समुहातर्फे श्रद्धांजली

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात कोकरनाग येथे ‘लष्कर-ए-तोयबा’ या पाक पुरस्कृत अतिरेकी संघटनेच्या दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात भारतीय सुरक्षा दलातील तीन अधिकारी व एका जवानासह चार जण शहीद झाले आहेत. या भ्याड हल्ल्याचा संजीवनी उद्योग समुहाच्या वतीने समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार तथा भाजप नेत्या स्नेहलताताई कोल्हे आणि सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी तीव्र निषेध करून शहीद झालेल्या या चार भारतीय सुपुत्रांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

त्यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. दहशतवादी कारवायांना सतत खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकार ‘जशास तसे’ उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. या भ्याड हल्ल्याची पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागणार, असे स्नेहलताताई कोल्हे यांनी म्हटले आहे.

अनंतनाग जिल्ह्यातील कोकरनाग येथील जंगल परिसरात काही दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर बुधवारी राष्ट्रीय रायफल्सच्या तुकडीसह भारतीय सुरक्षा दलाने शोध मोहीम सुरू केली होती. या शोधमोहिमे दरम्यान सुरक्षा दलाचे अधिकारी दहशतवादी लपलेल्या ठिकाणी पोहोचताच दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. त्यानंतर झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोंचक, जम्मू-काश्मीर पोलिस दलातील पोलिस उपाधीक्षक हुमायूँ भट व एक भारतीय जवान अशा चारजणांचा मृत्यू झाला.

‘लष्कर-ए-तोयबा’ (टीआरएफ) या अतिरेकी संघटनेने केलेल्या या दहशतवादी हल्ल्यामध्ये भारताच्या चार जांबाज अधिकाऱ्यांना हौतात्म्य प्राप्त झाले. देशाचे रक्षण करताना त्यांना वीरमरण आले असून, त्यांचे बलिदान देश सदैव स्मरणात ठेवील. गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तान भारतात अतिरेकी हल्ले करून अशांतता माजविण्याचा प्रयत्न करीत आहे. पाकिस्तानच्या चिथावणीवरून अलीकडच्या काळात जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्या असून, अनंतनाग जिल्ह्यात घडलेली ही घटना निषेधार्ह आहे.

दहशतवाद्यांसोबत उडालेल्या चकमकीत चार भारतीय अधिकाऱ्यांना वीरगती प्राप्त झाली. या घटनेने देशभरात शोकसंतप्त प्रतिक्रिया उमटली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या तीन वर्षांतील हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे. यापूर्वी ३० मार्च २०२० रोजी काश्मीरमधील हंदवाडा येथे झालेल्या हल्ल्यात पाच भारतीय सुरक्षा अधिकारी शहीद झाले होते. आता पुन्हा एकदा ‘लष्कर-ए-तोयबा’ च्या दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्याला भारतीय लष्कराने सडेतोड उत्तर द्यावे, असे स्नेहलताताई कोल्हे म्हणाल्या.  

आज संपूर्ण जग दहशतवादाविरुद्ध एकवटले आहे. भारत हा शांतताप्रिय देश असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने सातत्याने दहशतवाद्यांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. आर्थिक दिवाळखोरीमुळे पाकिस्तानची अवस्था आधीच वाईट झाली आहे. काश्मीरच्या मुद्द्यावरून ढवळाढवळ न करण्याचा सल्ला भारताने अनेकदा देऊनही पाकिस्तानची लुडबुड थांबत नाही. पाकिस्तान दहशतवाद्यांना भारताविरोधात भडकावून व रसद पुरवून भारताला डिवचण्याचा प्रयत्न करीत आहे. काश्मीर खोऱ्यातील शांतता बिघडवण्यासाठी पाकिस्तान सीमेपलीकडून अतिरेकी पाठवण्याचा सतत प्रयत्न करत असून, कोकरनागमधील घटनेने पाकचे इरादे समोर आले आहेत. जम्मू-काश्मीरमध्ये घुसण्याचा दहशतवाद्यांचा डाव भारताच्या लष्कर व सुरक्षा दलांनी उधळून लावला आहे. भारतातील मोदी सरकार पाकिस्तानचे नापाक मनसुबे कदापिही यशस्वी होऊ देणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने भारताला सक्षम व कणखर नेतृत्व लाभले असून, दहशतवादाला कसे चिरडायचे ते आपल्या भारत देशाला चांगले ठाऊक आहे. काही विरोधकांनी अशा घटनांचे राजकारण करू नये. मोदी सरकार व भारतीय लष्कर भारतात दहशतवादी हल्ले करणाऱ्यांचा व त्यांना बळ देणाऱ्या पाकिस्तानचा हिशेब चुकता केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही हे पाकिस्तानने लक्षात ठेवावे, असेही कोल्हे यांनी म्हटले आहे.