स्वातंत्र्य, समता व सामाजिक ऐक्य अबाधित ठेवून एकमेकांशी माणुसकीने वागा- स्नेहलता कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १५ : आज संपूर्ण देशात गल्लीपासून दिल्लीपर्यंत सर्वत्र स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी दीडशे वर्षांच्या इंग्रजांच्या गुलामीच्या जोखडातून स्वतंत्र झाला. भारताला फार मोठ्या संघर्षातून स्वातंत्र्य मिळाले असून, त्यासाठी अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी, स्वातंत्र्यवीरांनी आपले बलिदान दिले.

आपण सर्वांनी स्वातंत्र्यलढ्यातील सर्व हुतात्म्यांना वंदन करून त्यांचे कायम स्मरण केले पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली भारत सर्व क्षेत्रात झपाट्याने प्रगती करत असून, त्यांच्या प्रयत्नांना आपण साथ दिली पाहिजे. मानवता हाच खरा धर्म असून, आपण सर्वांनी स्वातंत्र्य, समता, एकता, बंधुभाव व सामाजिक ऐक्य अबाधित ठेवून एकमेकांशी माणुसकीच्या भावनेतून वागले पाहिजे, असे प्रतिपादन कोपरगाव विधानसभा मतदारसंघाच्या माजी आ. स्नेहलता कोल्हे यांनी सांगितले..

भारताच्या ७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मंगळवारी (१५ ऑगस्ट) सकाळी ८.१५ वाजता कोपरगाव शहरातील टी. डी. बी. बिल्डिंगमधील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात माजी आ. स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर आयोजित कार्यक्रमात  बोलताना स्नेहलता कोल्हे यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या सर्व स्वातंत्र्यवीरांना नमन करून देशवासीयांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

त्या म्हणाल्या, माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे यांनी आधी देश, नंतर पक्ष आणि इतर सर्व काही ही भूमिका घेऊन देशहिताचा प्रथम विचार केला. सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी राजकीय मतभेद विसरून भारतीय स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन यासारखे राष्ट्रीय सण, उत्सव एकत्र येऊन साजरे करण्याची परंपरा स्व. कोल्हे यांनी कोपरगाव शहरात सुरू केली. गेल्या ६०-६२ वर्षांपासून ही परंपरा अखंड चालू आहे. स्व. कोल्हे यांनी सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन समाजकारण व राजकारण केले. कोपरगाव शहरात व तालुक्यात कधीही जातीय तेढ निर्माण होणार नाही, याची सतत काळजी घेतली.

माझ्यासह संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे व कोल्हे कुटुंबातील सर्वजण स्व. कोल्हे यांचा हा विचार घेऊन वाटचाल करत आहोत. समाजात अशांतता पसरविणाऱ्या समाजविघातक शक्तींपासून दूर राहून सर्वांनी माणुसकी जोपासत गुण्यागोविंदाने एकत्र राहिले पाहिजे. मी व कोल्हे कुटुंबीय सामाजिक बांधिलकी जोपासत कोपरगाव मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने काम करत आहोत. 

स्नेहलता कोल्हे म्हणाल्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रूपाने भारताला एक सक्षम, कर्तृत्ववान व समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करणारे, विकासाची दूरदृष्टी असलेले प्रगल्भ व कणखर नेतृत्व लाभले आहे. पंतप्रधान मोदी यांनी भारताचे नाव जगभरात उंचावले असून, ते समर्पित वृत्तीने देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अहोरात्र काम करत आहेत. ते देशात गरीब कल्याणाचा अजेंडा राबवत असून, गेल्या ९ वर्षांत त्यांनी जनसामान्यांच्या विकासासाठी अनेक योजना यशस्विरीत्या राबविल्या आहेत.

कोरोना काळात पंतप्रधान मोदी यांनी भारतीयांना कोरोनापासून सुरक्षित ठेवून देशात तयार झालेली कोव्हिड प्रतिबंधक लस १०० देशांना दिली. त्यांच्या कार्यकाळात भारताची अर्थव्यवस्था जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कुशल नेतृत्वाखाली भारताच्या विकासाची वाटचाल अखंड चालू असून, या वाटचालीत व भारताला जागतिक महासत्ता बनविण्यासाठी सर्वांनी त्यांना खंबीरपणे साथ देण्याची गरज आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या समारोपानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभर ‘हर घर तिरंगा’ मोहीम राबविण्यात आली. तसेच ‘मेरी माटी, मेरा देश’ अर्थात ‘माझी माती, माझा देश’ या अभियानांतर्गत शीलाफलकाची उभारणी व लोकार्पण, पंचप्राण प्रतिज्ञा, मातृभूमीसाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यवीरांना, शहीद जवानांना व माजी सैनिकांना नमन, त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान, वसुधा वंदन आदी विविध उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.   

याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले, शफिकभाई सय्यद यांनी मनोगत व्यक्त केले. भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे शहराध्यक्ष खालिकभाई कुरेशी यांनी ‘भारत देश है महान, तिरंगा है मेरी शान’, ‘दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए’ यासारखी देशभक्तीपर गीते सादर करून वातावरण देशभक्तीमय बनवले.

स्वातंत्र्य दिनानिमित्त मंगळवारी सकाळी ७.५५ वाजता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काळे यांच्या हस्ते सार्वजनिक ध्वजारोहण झाले. ८.०५ वा. कोपरगाव तालुका काँग्रेस समिती कार्यालयात काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आकाश नागरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ९.०५ वा. तहसील कार्यालयात तहसीलदार संदीपकुमार भोसले यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ झाला. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर सकाळी ९.४० वाजता संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांच्या हस्ते व कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण झाले.

विविध ठिकाणी झालेल्या ध्वजारोहण समारंभास भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष शरद नाना थोरात, तालुकाध्यक्ष साहेबराव रोहोम, शहराध्यक्ष डी. आर. काळे, बाळासाहेब नरोडे, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस नितीन शिंदे, ज्येष्ठ नागरिक मंचचे अध्यक्ष राजेंद्र बंब, माजी नगराध्यक्ष दिलीपराव दारूणकर, राजेंद्र सोनवणे, रवींद्र पाठक, विनोद राक्षे, माजी उपनगराध्यक्ष स्वप्नील निखाडे, योगेश बागुल, अल्ताफ कुरेशी, माजी नगरसेवक बबलू ऊर्फ नयनकुमार वाणी, जनार्दन कदम, अशोकराव लकारे, संदीप देवकर, शिवाजीराव खांडेकर, पंडितराव पंडोरे, कैलास खैरे, आरपीआय नेते दीपक गायकवाड, भाजयुमोचे शहराध्यक्ष अविनाश पाठक, ‘अमृत संजीवनी’ चे संचालक गोपीनाथ गायकवाड,

संजीवनी पतसंस्थेचे संचालक राजेंद्र बागुल, वैभव गिरमे, दीपक जपे, नारायण अग्रवाल, जयेश बडवे, वैभव आढाव, बाळासाहेब लकारे, नारायण गवळी, चंद्रकांत वाघमारे, राजेंद्र लोखंडे, गोपीनाथ सोनवणे, फकिर मोहम्मद शेख, नसीरभाई सय्यद, सद्दामभाई सय्यद, एस. पी. पठाण, सचिन सावंत, पिंकी चोपडा, किरण सुपेकर, शंकर बिऱ्हाडे, लक्ष्मण साबळे, शरद त्रिभुवन, इलियासभाई खाटीक, विक्रांत सोनवणे, अंकुश जोशी, लक्ष्मण साबळे आदींसह स्वातंत्र्यसैनिक, भाजप, शिवसेना आदी विविध पक्ष, संस्था, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.