कोपरगाव प्रतिनिधी, दि. ०३ : दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असणारा कोपरगांव विधानसभा मतदार संघातील झगडे फाटा ते वडगाव पान फाटा हा राज्यमार्ग ६५ नॅशनल हायवेकडे वर्ग करावा अशी मागणी आमदार काळे यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्याकडे केली आहे.
कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक महत्वाच्या रस्त्यांचा विकास करून आमदार काळे यांनी कोपरगाव तालुक्यातून जात असलेला सावळीविहीर ते सेंधवा (म.प्र.) एन.एच.७५२ ज, हा राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडे हस्तांतरण करण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडे केलेल्या सर्वोतोपरी प्रयत्नांमुळे एन.एच. ७५२ जी, या राष्ट्रीय राजमार्गाचे काम प्रगतीपथावर असून, सावळी विहीर फाटा ते कोपरगाव या ११ किलोमीटर रस्त्यांसाठी १९१ कोटी निधी आणला आहे.
त्याच धर्तीवर कोपरगाव विधानसभा मतदार झगडे फाटा ते वडगाव पान फाटा हा राज्यमार्ग ६५ जवळपास ३४.२०० कि.मी. लांबीच्या रस्त्याचा विकास होण्यासाठी हा रस्ता नॅशनल हायवेकडे वर्ग करावा अशा मागणीचे निवेदन आ. आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.रवींद्र चव्हाण यांना दिले आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी असे म्हटले आहे की, झगडे फाटा ते वडगाव पान रस्त्यावर दररोज अंदाजे १ लाख ०५ हजार मेट्रिक टनापर्यंत वाहतूक होत असून, दररोज १० हजार पेक्षा जास्त वाहनांची वर्दळ असते. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक होत असल्यामुळे रस्त्याची नेहमीच दुरवस्था होत असते. हा मार्ग पुणे- संगमनेर ते कोपरगांव औरंगाबाद या शहरांना जोडणारा प्रमुख महामार्ग आहे.
अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या या महामार्गाचे नियमित काम होणे गरजेचे असून हा महामार्ग नॅशनल हायवे कडे वर्ग करणे अत्यंत गरजचे आहे. त्यामुळे हा राज्यमार्ग ६५ झगडे फाटा ते वडगाव पान फाटा रस्ता नॅशनल हायवेकडे तातडीने वर्ग करावा, अशी मागणी केली आहे. या मागणीची सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांनी गांभिर्याने दखल घेवून तातडीने कार्यवाही करू अशी ग्वाही दिली असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.