२१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
शेवगाव प्रतिनिधी, दि. १६ : तालुक्यातील ट्रॅक्टर, ट्रॉली चोरीतील टोळीचा म्होरख्या भारत अशोक चितळकर (रा.गुंतेगाव ता.गेवराई,जि.बीड) यास शेवगाव पोलीसांनी जेरबंद केले तसेच त्याच्या साथीदाराकडून पाच गुन्ह्यातील ट्रॅक्टर व ट्रॉलीसह एकुण २१ लाख, पंधरा हजार रु. किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
ट्रॅक्टर ट्रॉली चोरी प्रकरणातील मुख्य आरोपीच्या साथीदारांना गेल्या तीन महिन्यापूर्वीच पोलिसांनी जेरबंद केले होते मात्र मुख्य आरोपी फरार असल्याने शेवगाव पोलिस त्याचा कसून शोध घेत होते त्यात त्यांना यश मिळाले. या प्रकरणी सविस्तर माहिती अशी की, तीन ते चार महिन्यापासुन शेवगाव तालुक्यातील आखेगाव , वाडगाव, सुकळी, हसनापुर, आव्हाणे, येथुन ट्रॅक्टर व ट्रॉली चोरीला गेल्याच्या घटना घडल्याने शेवगाव पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले होते.
यात योगेश बाबासाहेब गरड रा. सुकळी ,ता.शेवगाव, विक्रम धोडींबा जवरे रा.वाडगाव, विठ्ठल विक्रम ढाकणे रा. हसनापुर, सुधाकर भिवसेन काटे रा.आखेगाव आदि शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर व ट्रॉली चोरीला गेल्याच्या तक्रारी शेवगाव पोलीस स्टेशनला दाखल झाल्या होत्या. पोलीस अधीक्षक ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी या प्रकरणी नेमलेल्या पोलीस पथकाने या प्रकरणातील संशयित आरोपी गणेश काकासाहेब झिरपे (रा.कोळगाव ता.शेवगाव) यास सापाळा रचुन ताब्यात घेतले होते.
त्याचेकडे वरील ट्रॅक्टर व ट्रॉलीबाबत चौकशी केली असता त्यांने त्याचे साथीदार संजय रावसाहेब खर्चन , रा.आखेगाव, ता. मुख्य आरोपी भारत अशोक चितळकर, रा.गुंतेगाव ता.गेवराई , सचिन गोर्डे, रा.गुंतेगाव ता.गेवराई, लाला गोर्डे, रा.गुंतेगाव ता.गेवराई, यांचेसह ट्रॅक्टर व ट्रॉली चोरीचे वरील गुन्हे केल्याची कबुली दिली होती.
मुख्य आरोपी भारत अशोक चितळकर हा पोलिसांना गेल्या तीन महिन्यापासून गुंगारा देत होता. अखेर चितळकर याला शेवगाव पोलिसांनी अटक केली त्याच्याकडून पाच गुन्ह्यातील चोरीस गेलेले ट्रॅक्टर व ट्रॉली असा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास पुजारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास पावरा, रवींद्र बागुल आशिष शेळके, गुप्त वार्ता विभागाचे बप्पासाहेब धाकतोडे, सुखदेव धोत्रे, राजू ढाकणे, संपत खेडकर, सचिन खेडकर, रामहरी खेडकर, पोलीस कॉन्स्टेबल नाकाडे, मरकड, शेळके, टेकाळे, रवींद्र शेळके, सोमनाथ घुगे आदींनी केली.