एका आठवड्यात कोपरगावकरांना मिळणार सहाशे रुपये ब्रासने वाळू – तहसीलदार भोसले

वाळु तस्करांच्या मुसक्या आवळलायला सुरुवात

कोपरगाव प्रतिनिधी, दि.२३ : तालुक्यातील गोदावरी नदी पाञातुन अवैध वाळू उपसा करुन वाळू तस्करांनी पोलीस, महसुलच्या अधिकाऱ्यावर दादागिरी निर्माण करून वाळू तस्करीचा धंदा जोरात सुरु केल्याने अखेर कोपरगावचे तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी वाळू तस्करांवर करडी नजर ठेवली असुन यापुढे तालुक्यातील ज्या भागात वाळु अधिक प्रमाणात आहे. त्या ठिकाणी बैठे पथकांची नियुक्ती केल्याने वाळु तस्करांची धावपळ होणार आहे.

 महसूल मंञी राधाकृष्ण विखे यांनी गेल्या अनेक महिण्यापुर्वी सहाशे रुपये ब्रासने वाळू देण्याचे जाहीर केले असले तरीही त्यांच्याच जिल्ह्यात सहाशे रूपयात शंभर टक्के वाळू मिळत नाही. येत्या आठ दिवसांत सहाशे रुपयात वाळू मिळणार का याकडे कोपरगाकरांचे लक्ष लागले आहे. 

तसेच येत्या आठ दिवसांत तालुक्यातील सर्वसामान्य नागरीकांना आता केवळ सहाशे रुपयात एक ब्रास वाळु देणार असल्याने चढ्या भावात वाळु तस्करांकडू नागरीक वाळू विकत घेणार नाहीत. दिवस राञ महसुल विभाग वाळू तस्करांवर करडी नजर ठेवून शांत बसणार नाही.

तर ज्या ठिकाणी बेकायदा वाळू उपसा करताना अथवा वाहतूक करताना तसेच वाळूचा साठा आढळला तर पाचपट दंड ठोकून संबंधितांवर शासकीय नियमानुसार कारवाई करुन वाळु वाहतुकीत वापरलेले वाहन जप्त करणार असल्याची माहिती तहसीलदार संदीपकुमार भोसले यांनी लोकसंवादच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

ते पुढे म्हणाले की, तालुक्यातील सुरेगाव व माहेगाव देशमुख या ठिकाणच्या नदी पाञातुन वाळुचा लिलाव करण्यात आला असुन मुंबईचे ठेकेदार केतन भानुशाली यांना वाळू उपशाचा ठेका देण्यात आला आहे. अंदाजे २० हजार ब्रास वाळुचा लिलाव देण्यात आला आहे. लवकरच कुंभारी येथील वाळुचा लिलाव केला जाणार आहे. २० हजार ब्रास उपसलेली ही वाळु केवळ सहाशे रुपये ब्रासने नदीकाठी येथे नागरीकांना दिली जाणार आहे. पुढील वाहतुकीचा खर्च संबंधीत नागरिकांनी करावयाचा आहे. 

दरम्यान तालुक्यातील चांदगव्हाण, माहेगाव, सुरेगाव, कुंभारी धारणगाव, येथून बेकायदा वाळू उपसा होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत. वाढती वाळू तस्करी थांबवण्यासाठी तहसीलदार संदीप कुमार भोसले यांनी दोन बैठे पथक निर्माण केले आहेत. त्या पथकामध्ये महसुली विभागाचे मंडल अधिकारी, तलाठी व कोतवाल यांचा सामावेश असणार आहे.

सात दिवस हे पथक विविध ठिकाणी सकाळी सहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ठिय्या मांडून वाळु तस्करांवर नजर ठेवणार आहे. या दरम्यान जो सापडेल त्याच्यावर कारवाई करणार आहेत. बैठे पथकाच्या जोडीला काही भरारी पथके तयार केले असुन त्या मार्फत दिवसरात्र फिरता पहारा ठेवला जाणार आहे.

बेकायदा वाळू जिथे दिसेल तिथे कारवाई करणार असल्याने कोपरगावचे तहसीलदार भोसले हे सध्या तरी वाळु तस्करांच्या पाठीमागे हातधूवून लागणार असेच दिसते. वाळू तस्करांची वाढलेली दादागिरी, तालुक्यातील नागरीकांना व अधिकाऱ्यांना खटकत आहे.