संजीवनी युवा प्रतिष्ठानकडून इर्शाळवाडीच्या आपत्तीग्रस्तांना मायेचा आधार

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : चार महिन्यांपूर्वी रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. या दुर्घटनेत इर्शाळवाडीतील अनेक कुटुंबं उद्धवस्त झाली. संपूर्ण देशभर दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला; परंतु इर्शाळवाडीकर अजूनही त्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. सामाजिक बांधिलकी जोपासत नेहमीच संकटग्रस्तांच्या मदतीला धावून जाणाऱ्या कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्या युवा सेवकांनी इर्शाळवाडी येथे १७ नोव्हेंबर रोजी भेट देऊन पीडितांना दिवाळीचा फराळ देऊन त्यांच्या व्यथा जाणून घेत त्यांना मायेचा आधार दिला. 

रायगड जिल्ह्यातील खालापूरनजीक इर्शाळगडाच्या कुशीत वसलेल्या इर्शाळवाडी येथे चार महिन्यांपूर्वी म्हणजे १९ जुलै २०२३ रोजी अतिवृष्टी होऊन रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास अचानक दरड कोसळली. इर्शाळवाडीवर दरडीने अचानक घाला घातला. एका क्षणात होत्याचे नव्हते झाले. या दुर्घटनेत संपूर्ण गाव दरडीखाली गाडले गेले. ८५ हून जास्त लोक मरण पावले. अनेक लोक जखमी झाले. अनेक लहान मुले अनाथ झाली.

अनेकांनी आपली जिवाभावाची माणसं गमावली. एकाच घरातील दोन-दोन, चार-चार, पाच-पाच लोक या अस्मानी संकटात मृत्युमुखी पडल्याने कुटुंबच्या कुटुंबं उद्धवस्त झाली. आपण ज्या निसर्गाच्या कुशीत राहतो तेथेच मरणकळा अनुभवयास मिळतील, असे इर्शाळवाडीतील लोकांना स्वप्नातदेखील वाटले नव्हते. आजही घटना आठवली की, काळजाचा थरकाप होतो. आज संपूर्ण इर्शाळवाडी एका भयावह संकटाला सामोरे जात आहे.

इर्शाळवाडी येथे चार महिन्यांपूर्वी घडलेल्या दुर्घटनेत अनेक कुटुंबं उद्धवस्त झाली. या संकटातून सावरण्यासाठी या निराधार कुटुंबांना, अनाथ मुलांना मानसिक व इतर प्रकारे आधार देण्याची गरज आहे. ज्या कुटुंबात दुःखद घटना घडलेली असते त्यांना सण घेऊन जाण्याची व आधार देण्याची आपल्या धर्मामध्ये प्रथा आहे. त्यानुसार संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांनी प्रत्यक्ष इर्शाळवाडीला जाऊन तेथील आपत्तीग्रस्तांना दिवाळी फराळ देऊन त्यांचे दु:ख हलके करण्याचा प्रयत्न केला. ‘वसुधैव कुटुंबकम’ ही संकल्पना व माणुसकीची ज्योत तरुणाईच्या मनात सदैव रहावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. त्यामुळे यंदाची ही दिवाळी खऱ्या अर्थाने आत्मिक समाधान देणारी ठरली. -विवेक कोल्हे, संस्थापक अध्यक्ष, संजीवनी युवा प्रतिष्ठान.

या दुर्घटनेतून बचावलेले इर्शाळवाडीतील लोक अद्यापही या दु:खातून सावरलेले नाहीत. ज्यांच्या घरी दुःख असते त्या घरातील लोक सण साजरा करत नाहीत. म्हणून कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, संवेदनशील मनाचे युवा नेते विवेक कोल्हे यांनी इर्शाळवाडीतील आपत्तीग्रस्त कुटुंबांना न विसरता, संवेदनशीलता व माणुसकी जपत संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या युवा सेवकांची टीम इर्शाळवाडी येथे पाठवली. या युवा सेवकांनी विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली १७ नोव्हेंबर (शुक्रवार) रोजी इर्शाळवाडी येथे प्रत्यक्ष जाऊन आपत्तीग्रस्तांना दिवाळी फराळ वाटप केला. आम्ही सर्वजण सदैव आपल्यासोबत आहोत, असे सांगत त्यांना मानसिक आधार देण्याचा प्रयत्न युवा सेवकांनी केला.

या युवा सेवकांनी इर्शाळवाडीतील आपत्तीग्रस्त कुटुंबांशी संवाद साधत त्यांच्या व्यथा-वेदना जाणून घेतल्या. त्यांच्याबरोबर वेळ घालवला. यावेळी आपत्तीग्रस्त नागरिकांनी युवा सेवकांना चार महिन्यांपूर्वी घडलेला घटनाक्रम सांगितला. त्यांच्या कटू आठवणी ऐकल्यावर युवा सेवकांच्या अंगावर काटाच उभा राहिला. त्यांना अश्रू अनावर झाले. तेथील काही माता-भगिनींना या युवा सेवकांना पाहताच दुर्घटनेत गमावलेल्या आपल्या कुटुंबातील व्यक्तींची आठवण होऊन त्यांनी अक्षरश: हंबरडा फोडला. इर्शाळवाडी ही दुर्गम भागात डोंगर-दरीत वसलेली एक लहान वस्ती आहे. आदिवासी समाजाचे लोक तेथे राहतात. त्या ठिकाणी रस्ता व इतर पुरेशा सोयी-सुविधाही उपलब्ध नाहीत.

इर्शाळवाडीत अचानक कोसळलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये अनेक कुटुंबातील कर्ते लोक मृत्युमुखी पडल्याने त्यांचे कुटुंबीय निराधार झाले असून, अनेक मुले-मुली अनाथ झाली आहेत. इर्शाळवाडीमध्ये एक ते अठरा वर्षे वयोगटातील ३० हून अधिक मुले-मुली असून, त्यापैकी अनेक जण सध्या आश्रमशाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. ही मुले दिवाळी सणानिमित्त आश्रमातून नुकतीच आपल्या नातेवाईकांकडे आलेली होती. इर्शाळवाडीतील आपत्तीग्रस्तांचे दु:ख व जगण्यासाठी चाललेला संघर्ष पाहून सर्व युवा सेवकांचे डोळे पाणावले. काळीज पिळवटून निघेल असे दृश्य इर्शाळवाडीला भेट दिलेल्या युवा सेवकांना पाहायला मिळाले. 

सध्या इर्शाळवाडीत जवळपास ४३ कुटुंबे कुटुंबं राहत आहेत. या आपत्तीग्रस्त नागरिकांना शासनाने मदत करून पुनर्वसनकार्य हाती घेतले आहे. शासन व स्वयंसेवी संस्थांकडून त्यांना मदत मिळत असली तरी अजूनही तेथील लोक घडलेल्या त्या भयावह घटनेतून मानसिकरित्या अजूनही सावरलेले नाहीत. आज त्यांना जीवनावश्यक वस्तू, आर्थिक मदतीपेक्षाही मानसिक आधाराची प्रचंड गरज असल्याचे जाणवते.

संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली इर्शाळवाडीला गेलेल्या टीममध्ये रामदास गायकवाड, सिद्धार्थ साठे, रोहित कनगरे, राहुल माळी, सतीश निकम, सागर राऊत, ऋषिकेश निकम, विशाल चोरगे, ऋषिकेश गायकवाड, अविनाश विधाते, कृष्णा खरोटे, राहुल लाड, पवन अहिरे, संकेत शिंगाडे, रुपेश सिनगर, अनिल गायकवाड, नीलेश बोरुडे, दीपक बारवकर, अभिजीत भागवत, विकी परदेशी, अभि सूर्यवंशी, सिद्धार्थ पाटणकर, विकी खर्डे, यश सूर्यवंशी, भूषण सूर्यवंशी, वैभव सोळसे, ओम बागुल, स्वराज सूर्यवंशी, भैय्या नागरे, अर्जुन मरसाळे, अमोल बागुल, ओम दुसाने आदींचा समावेश होता.