जगदगुरू स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांचे कार्य अलौकिक – बिपीन कोल्हे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २३ : जगद्गुरु स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचे कार्य खूप मोठे आहे. ‘तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा’ ही त्यांची विचारधारा आहे. त्यांच्या प्रेरणेतून अनेक अध्यात्मिक, सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या सुरू आहेत. हिंदू धर्म, संस्कृती व पर्यावरणाचे संरक्षण करण्याबरोबरच समाजाची मानसिकता बदलून नवी दिशा देण्याचे काम ते करत आहेत. नरेंद्राचार्यजी महाराजांच्या शिकवणीचे तंतोतंत पालन करण्यावर सर्वांनी भर द्यावा. कारण, त्यातच आपल्या जीवनाचे सार्थक आहे, असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले.

स्व-स्वरूप संप्रदाय उत्तर नगर जिल्हा शाखेच्या वतीने बुधवारी (२२ नोव्हेंबर) कोपरगाव येथे श्रीक्षेत्र नाणीज धाम येथील अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य, श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा आयोजित केला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. प्रारंभी त्यांनी स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुकांचे मनोभावे दर्शन घेतले. या सोहळ्यात बिपीन कोल्हे यांच्या हस्ते जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने दुर्बल घटक पुनवर्सन उपक्रमांतर्गत २५ महिलांना मोफत शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी प.पू. राघवेश्वरानंदगिरीजी ऊर्फ उंडे महाराज, माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे, अक्षय काळे, जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानचे उत्तर महाराष्ट्र पीठ व्यवस्थापक प्रवीण ठाकूर, उपजिल्हाध्यक्ष व निरीक्षक दत्तात्रय उन्हाळे, जिल्हा सेवा अध्यक्ष सयाजी भडांगे, दहिफळे, दत्तात्रय बारसे, सुरेश चंदनशिव, महेंद्र सिनगर, संदीप दीक्षित, जगन्नाथ बोठे, पादुका व्यवस्थापक रानभरे, मिटकर, मध्य प्रदेश निरीक्षक नवनाथ गुडघे, अनिल वाघे, संग्राम सेनाप्रमुख अशोक मुसमाडे आदींसह स्व-स्वरूप संप्रदाय भक्त परिवार, संग्राम सेनेचे पदाधिकारी, साधक, भाविक-भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ‘श्री’ पादुका व गुरुपूजन सोहळा, आरती, प्रवचन, उपासक दीक्षा, पादुका दर्शन, पुष्पवृष्टी आदी कार्यक्रम झाले. जगदगुरू स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कार्यावर आधारित चित्रफित यावेळी दाखविण्यात आली.

बिपीन कोल्हे यांनी जगदगुरू स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने नाणीज येथील जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध सामाजिक व आध्यात्मिक उपक्रमांचे कौतुक केले. ते म्हणाले, या संस्थानने मोफत हॉस्पिटल सेवा, पंतप्रधान व मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कोट्यवधी रुपयांचा मदत निधी, बेरोजगारांसाठी विनामूल्य ड्रायव्हिंग स्कूल, दर्जेदार व मोफत शिक्षण देणारे शैक्षणिक संकुल, कोरोना काळात मोफत रुग्णवाहिका, रक्तदान शिबिरे, दुष्काळात चारा, पाट्या वाटप आदी अनेक उपक्रम राबविले आहेत.

गेल्या १३ वर्षांपासून संस्थानतर्फे रुग्णांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा सुरू असून, त्यातून त्यांनी आजवर जवळपास १९ हजार लोकांचे प्राण वाचवले आहेत. जगदगुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या प्रेरणेने मरणोत्तर देहदानाची, अवयवदानाची चळवळ सुरू झाली आहे. जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानकडे आजपर्यंत ५० हजारांवर लोकांनी देहदानाचे अर्ज भरून दिले आहेत. नरेंद्राचार्यजी महाराज दुर्बल लोकांना अध्यात्मिक शक्ती देऊन प्रबोधनाचे काम करत आहेत. जगदगुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानने माता-भगिनींना आत्मनिर्भर बनविण्यासाठी आज दुर्बल घटक पुनवर्सन उपक्रमांतर्गत २५ मोफत शिलाई मशीनचे वाटप करून स्तुत्य उपक्रम राबवला आहे. 

आपण धार्मिक स्थानाबरोबर जोडलो गेलो तर आपल्याला आत्मिक समाधान मिळते. संत ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठात ‘देवाचिये द्वारीं उभा क्षणभरी। तेणें मुक्ति चारी साधिलिया॥‘ असे म्हटले आहे. त्याप्रमाणे आज या सोहळ्यात दीक्षा घेतलेल्या उपासक मंडळीची सर्व चुकीच्या गोष्टींना फाटा देऊन आजपासून जगदगुरू श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली वेगळ्या मार्गाने वाटचाल सुरू झाली आहे. हे सर्वजण आता नवचैतन्य व नवीन ऊर्जा घेऊन पुढील आयुष्य जगणार आहेत. जगदगुरू स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुकांचे दर्शन घेऊन त्यांनी पहिले पाऊल टाकले आहे.

नाणीज येथे जाऊन प्रत्यक्ष नरेंद्राचार्यजी महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर त्यांना परमोच्च ऊर्जा प्राप्त होणार आहे. ही वाट तशी खडतर आहे. जीवनात आपल्याला अनेकदा त्याग करावा लागतो. त्यामुळे उपासकांनी वाईट गोष्टींचा त्याग करून जगदगुरू स्वामी नरेंद्राचार्यजी महाराजांची शिकवण आचरणात आणली तर त्यांच्या जीवनात समृद्धीची नवी पहाट उगवणार आहे. जगदगुरू स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या कृपेने यापुढील काळात या उपासकांची पावले सरळ दिशेने पडत राहतील अशी मला खात्री आहे. भारतीय संस्कृती ही जगात सर्वश्रेष्ठ आहे. त्याला कारण आपल्या देशातील संतपरंपरा आहे. नरेंद्राचार्यजी महाराजांसारख्या संतांनी आपल्याला समाजासाठी जगायला शिकवले म्हणून आपली संस्कृती टिकून आहे, असेही कोल्हे म्हणाले.