कोपरगाव प्रतिनिधी, दि.१६ : येथील तहसील कार्यालयालगतच्या मैदानावर आयोजित प्रभू श्रीराम चरित्र चिंतन कथा सोहळ्यास संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे आणि माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी उपस्थित राहून भगवान श्रीरामाची महाआरती केली. प्रसिद्ध अभ्यासक व प्रवचनकार शिवभक्त भाऊ पाटील (त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) यांच्या सुमधुर वाणीतून श्रीराम कथेचे श्रवण केले. प्रसंगी महंत रमेशगिरीजी महाराज यांचे आशीर्वाद घेतले.
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर उभारण्यात आलेल्या भव्य श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि श्री रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा येत्या २२ जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनेक साधू-संतांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. त्याचे औचित्य साधून जय जनार्दन भक्त परिवाराच्या वतीने कोपरगाव येथील तहसील कार्यालयालगतच्या मैदानावर १२ जानेवारी ते १८ जानेवारी या कालावधीत सायंकाळी ७ ते रात्री १० या वेळेत मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या दिव्य जीवनावर आधारित श्रीराम चरित्र चिंतन कथा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
प्रवचनकार शिवभक्त भाऊ पाटील हे श्रीराम कथा वाचन करीत असून, या सोहळ्यास भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रीराम कथेचा आनंद घेत आहेत. मकर संक्रांतीच्या पावन पर्वावर सोमवारी (१५ जानेवारी) संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी या सोहळ्यात सहभागी होऊन प्रभू श्रीरामाची महाआरती केली.
तसेच श्रीराम कथेचे श्रवण केले. यावेळी त्यांनी प्रवचनकार शिवभक्त भाऊ पाटील व राष्ट्रसंत जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज आश्रमाचे मठाधिपती प.पू. रमेशगिरीजी महाराज यांचे पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. याप्रसंगी श्रीरामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.