विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये अभ्यासा बरोबरच मैदानी खेळ महत्वाची भूमिका बजावतात – प्रा. सुनील आढाव

शेवगाव प्रतिनिधी, दि.१६ :  मोबाईल मधील खेळ विद्यार्थ्यांना एकाच जागी बसवुन अमूल्य वेळ वाया घालवतात. तसेच डोळे, मान, मनके दुखी सारखे आजार बोनस म्हणून देतात. मात्र, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये अभ्यासा बरोबरच मैदानी खेळ ही महत्वाची भूमिका बजावतात व आरोग्य हीच खरी धनसंपदा असल्याचे प्रतिपादन प्रा. सुनील आढाव यांनी केले.

येथील निर्मल ब्राईट फ्युचर स्कूल (सीबीएसई) मध्ये मंगळवारी यावर्षीच्या वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन येथील हृदयरोग तज्ञ डॉ. सुशील कबाडी व  व्यापारी प्रवीण लाहोटी यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. या वेळी प्रा. आढाव  बोलत होते.

यावेळी प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करून सामुदायिकरित्या सर्व विद्यार्थ्यांकडून क्रिडा प्रतिज्ञाचे पठण करण्यात आले. महोत्सवाचा प्रारंभ आकाशात फुगे सोडून करण्यात आला.

डॉ. कबाडी यांनी बालपणीतील आठवणींना उजाळा देत शारीरिक व बौद्धिक विकासासाठी खेळाचे महत्व विषद केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. शंकर वरखेडे यांनी विद्यार्थ्यांना खिलाडू वृत्ती जोपासण्याचे आवाहन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. क्रीडा शिक्षक आशिष मेहत्रे यांनी सर्व स्पर्धेचे नियोजन केले. आदिनाथ ठोंबरे यानी प्रास्ताविक केले. बाळू निळ यांनी सूत्रसंचलन केले. सागर गजभिव यांनी आभार मानले.