लम्पी आजाराच्या धसक्यानंतर भरला बाजार
कोपरगाव प्रतिनिधी दि.२८ : करोनाने माणसांचे आरोग्य धोक्यात आणल्यामुळे दोन वर्षे लाॅकडाऊन करुन जनजीवन विस्कळित झाले होते. त्यानंतर जनावरामध्ये लम्पी आजाराने थैमान घातल्याने जनावरांचा जीव धोक्यात आला होता, तर पशुधनावर अवलंबून असलेल्यांचे आर्थीक गणित बिघडले होते. गेल्या तीन महीण्यापासुन जनावरांचा आठवडी बाजार संसर्गामुळे बंद ठेवल्याने जनावरांच्या खरेदी विक्रीची उलाढाल ठप्प झाली होती.
अखेर २६ डिसेंबर रोजी कोपरगाव कृषि उत्पन्न बाजार समितीच्यावतीने जनावरांचा बाजार सुरू केल्यानंतर पहील्याच बाजारात तब्बल १८० जनावरांची आवक होवून त्यात ७५ जनावरांची खरेदीविक्री झाली. या झालेल्या व्यवहारातुन सरासरी १० लाखाची आर्थीक उलाढाल झाल्याची माहीती. कोपरगाव कृषि उत्पन्न बाजार समितीचे सचिव नानासाहेब रणशुर यांनी दिली.
रणशुर पुढे म्हणाले. लम्पी आजाराच्या प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून जनावरांचा आठवडे बाजार शासकीय नियमाप्रमाणे बंद करण्यात आला होता. सध्या संसर्ग कमी झाल्यामुळे पुन्हा शासनाच्या निर्णयानुसार बाजार सुरु केला. माञ विक्रीसाठी आलेल्या जनावरांची वैद्यकीय तपासणी केल्या शिवाय बाजार समितीच्या आवारात जानावरे विक्रीसाठी येवू दिले नाही. तपासणीसाठी कोपरगाव पंचायत समितीचे पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.दिलीप दहे यांनी जनावरांची वैद्यकीय तपासणी केली.
एकही जनावर बाधीत आढळून न आल्याने बाजारामध्ये शेतकऱ्यांनी जनावरांची खरेदी विक्री जोमात सुरु केली. बहुतांश शेतकरी व व्यापारी यांनी लम्पी आजाराला घाबरुन व शासकीय नियमावलीचा धसका घेवुन बाजारात आलेच नाहीत. तरीही पहील्या बाजारात १० लाखाची उलाढाल झाली. बाजार समितीच्यावतीने शेतकऱ्यांना लम्पी आजाराच्या संदर्भात योग्य त्या सुचना देण्यात आल्या होत्या. अनेक ठिकाणी सुचना फलक लावण्यात आले होते.
प्रत्येक जनावरांना फाटकामध्ये घेण्यापुर्वी तपासणी करण्यात येत होती. बाजार समितीचे कर्मचारी व वैद्यकीय कर्मचारी या कामात मग्न होते. तालुक्यात लम्पी आजाराचे प्रमाण कमी झाल्यामुळे आठवडे बाजार यापुढे मोठ्या प्रमाणात भरणार असल्याची माहीती देत शेतकऱ्यांनी या बाजारात सामिल होण्याचे आवाहन रणशुर यांनी केले आहे.